पुणे-बंगळुरू महामार्गावर पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या खंबाटकी घाटाच्या रस्ता रुंदीकरणात चुकीच्या पद्धतीने डोंगर तोडण्यात आल्यामुळे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात खंबाटकी घाटातील दरडी कोसळल्या. रस्ता रुंदीकरणासाठी घाट फोडताना निसर्गनिर्मित पाणी वाहून नेणारे नाले, ओढे, ओघळ, मोऱ्या बुजविण्यात आल्याने शुक्रवारी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर आले. खंबाटकी घाट रस्त्यावर महापुरासारखे पाण्याचे लोंढे आल्याने घाट चढत असणाऱ्या वाहनचालकांच्या मनात धडकीच भरली.
शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान खंडाळा, खंबाटकी घाट डोंगरमाथा, वेळे (ता. वाई) सोळशी (ता.कोरेगाव) परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने खंडाळा गावात आणि खंबाटकी घाटाचे मोठे नुकसान झाले. खंडाळ्यात तहसील कचेरीसह व्यापारी पेठेत, रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसले. यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. खंबाटकी घाटात रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर चुकीच्या पद्धतीने तोडल्याने पहिल्याच मुसळधार पावसाने वाहनचालकांची त्रेधातिरपिट उडविली. पावसाने रस्त्यालगतच्या दरडी एकामागून एक कोसळत होत्या. दरडी कोसळण्यापाठोपाठ पाण्याचे लोट रस्त्यावर आले. सुरुवातीला चालकांनी एका बाजूने मार्ग काढून जलप्रपातातून आपली वाहने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाटात महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या अंगाचा थरकाप उडाला. रस्त्यावर फक्त पावसाचे पाणी, धुके आणि संरक्षक कठडेच दिसत होते. थोडय़ाच वेळात पाण्याने आणि मुरमाने सगळा रस्ताच व्यापून टाकला. डोंगर तोडताना चुकीच्या पद्धतीने डोंगर तोडण्यात आले. डोंगर तोडताना थोडाही उतार न ठेवता उंच उंच कडे ठेवण्यात आले. जुन्या घाटाच्या पाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या, रस्त्यालगतचे पाट बुजले गेले. पाणी वाहण्यासाठी जागा न राहिल्याने तीव्र उताराने पाणी मिळेल त्या मार्गाने गेल्याने हा प्रसंग ओढावल्याचे रस्ते बांधकामातील तज्ज्ञांनी सांगितले.
पुणे -बंगळुरू महामार्ग पूर्वी दुपदरी होता. त्याचे आधी चौपदरी तर आता सहापदरी रुंदीकरण करण्यात आले. पूर्वी फक्त घाट होता. आता बोगदा आणि एकेरी वाहतूकही झाली. तरीही या मार्गावर काही ना काही कारणांनी वाहतूक कोंडी नेहमीचीच गोष्ट झाली आहे. या पावसानेही रस्त्यावर दगड -गोटे, माती वाहून आल्याने वाहतूक पाच तास ठप्प होती. यावेळी सगळी यंत्रणा ठप्प झाल्याने व आपत्कालीन यंत्रणाही वेळीच कामी न आल्याने घाट रस्ता बंद झाला होता. वाहतूक वेळेत पूर्ववत होण्यासाठी तत्परतेने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. या रस्त्यावर कोल्हापूर, कर्नाटककडे जाणाऱ्या वाहतुकीबरोबरच महाबळेश्वर- पाचगणीकडे जाणारी वाहतूकही असते. फार विलंबाने यंत्रणा कामाला आली. रस्त्यावरचा गाळ बाजूला हलविण्यात आला आणि नंतर रात्री साडेनऊच्या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचा थोडा प्रयत्न झाला. शनिवारी व रविवारी मात्र रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीने काही घडलेच नाही अशा पद्धतीने रस्त्यावर पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले. या पाण्याच्या लोटामुळे घाटरस्ता आणखी कुमकुवत झाला आहे.