पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी असद खान, नांदेड येथील इम्रान खानसह एकूण पाच आरोपींना येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात दिले जाईल. गेल्या आठ दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयाने या आरोपींना महाराष्ट्र एटीएसच्या हवाली करावे, असा आदेश दिला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. दिल्ली पोलिसांकडून ते केव्हा महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात येतात, याची वाट पाहात असल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
औरंगाबादजवळील नायगाव येथे असद खान त्याच्या कुटुंबीयांसह राहात होता. अहमदनगर येथे राहणाऱ्या त्याच्या मेहुण्यासही पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद शहरातील हिमायतबाग परिसरात खासगी बसवाहतुकीचा व्यवसाय असद करीत असे. तसेच त्याचा भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. औरंगाबाद व नांदेड या दोन जिल्हय़ांत आरोपींचा संबंध असल्याने त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत या आरोपींना महाराष्ट्र एटीएसच्या स्वाधीन करणे, ही दिल्ली पोलिसांची जबाबदारी असल्याचे अधिकारी सांगतात. पुणे बॉम्बस्फोटाचे मराठवाडा कनेक्शन महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी तपासतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे असद खान व इम्रान या दोघांकडून माहिती मिळाल्यास मराठवाडय़ातील त्यांचे जाळे किती दूरवर पसरले आहे याची माहिती मिळू शकेल.

Story img Loader