Pune Rape Case Updates: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका२६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला रात्री गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्याला पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने गाडे याला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान आरोपीच्या वकीलांनी मध्यमांसमोर बोलताना न्यायालयात नेमकं काय युक्तीवाद झाला याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी आरोपी गाडे याच्या भावाला देखील पोलिसांनी सोबत ठेवल्याची माहिती वकीलांनी दिली आहे.
न्यायालयात युक्तीवाद काय झाला?
न्यायालयात युक्तीवाद काय झाला याबद्दल बोलताना आरोपीचे वकील वाजीद खान म्हणाले की, “आम्ही युक्तीवाद असा केला की, तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये. त्याच्यावर दाखल झालेले प्रकरण चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत. याशिवाय घटनेची वेळ ५ वाजून ४५ मिनिटांची म्हणजेच दिवसाचीच होती. कुठेही पीडितेने आरडा-ओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेले नाहीये, असा युक्तीवाद आम्ही केला आहे.”
“सरकारी वकीलांचं म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आणि आम्हाला मोबाईल, घटनेच्या वेळचे कपडे पाहिजेत,” असेही वाजीद खान म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की,” त्याच्या (आरोपीच्या) भावाला देखील पोलिसांनी सोबत ठेवलेलं आहे. त्याचा भाऊ सेम त्याच्यासारखा दिसतो.”
आरोपीने पळ का काढला?
तसेच आरोपीचे दुसरे वकील म्हणाले की, “आम्ही आरोपीशी चर्चा केली. त्याला आम्ही सत्य घटना काय आहे? अशी विचारणा केली असता, तो म्हणाला की, बसमध्ये आधी पीडित तरुणी चढली होती. नंतर मी गेलो. आमच्यात जे झाले, ते दोघांच्या संमतीने झाले.” जर संमतीने ती घटना घडली होती तर आरोपीने पळ का काढला? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता वकील म्हणाले की, त्याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही.