Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आगाऊ रक्कम भरण्यास सांगितल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करता आले नाही. परिणामी या महिलेची दुसऱ्या रुग्णालयात प्रसुती झाली असून त्यांना जुळी मुली झाल्या आहेत. परंतु, दुर्दैवाने प्रसूतीदरम्यान मातेचा जीव गेला. हे प्रकरण राज्यात सर्वत्र गाजतंय. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी पीडित कुटुंबियांची भेटही घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत एक्सवरून माहिती दिली.

आज पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेचे पती, नणंद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबीयांसोबत भाजपाचे आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिले आहे.

भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भेटीबाबत म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाईसुद्धा होईल.

ते पुढे म्हणाले, “पण आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.”

भेटीनंतर पीडितेचे कुटुंबीय काय म्हणाले?

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पीडित तनिषा भिसे यांच्या नणंद म्हणाल्या की, “डॉक्टर घैसास यांचा परवाणा रद्द करावा. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो असून, त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.”