लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी पुणे-हुबळी वंदेभारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळाली असून या गाडीला सांगली व मिरज स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याची माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावरून अधिक वेगवान गाड्या सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व तत्कालीन राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहाटे पाच वाजता हुबळीहून सुटणारी वंदे भारत धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा स्थानकावरील थांबा घेत दुपारी दीड वाजता पुण्यात पोहचणार आहे, तर परतीच्या प्रवासात पुण्याहून निघणारी वंदे भारत दुपारी सव्वादोन वाजता निघून हुबळीमध्ये रात्री पावणेअकरा वाजता पोहचेल.

आणखी वाचा-पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू

ही गाडी सोमवार वगळता रोज धावणार असून, संपूर्ण वातानुकूलित आठ कोच आहेत. हुबळी ते पुणे हे ५५८ किलोमीटर अंतरासाठी वंदेभारत एक्स्प्रेसला साडेआठ तास लागणार आहेत.