पुणे, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणांत दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सय्यद मकबूल याचे फोन टॅप करण्याची पोलीस निरीक्षकांची विनंती कोणत्याही सबळ कारणाविना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी फेटाळली नसती तर मोठा अनर्थ टळला असता, अशी माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी गेल्या २३ ऑक्टोबरला नांदेड जिल्हय़ातल्या धर्माबाद येथील सय्यद मकबूल सय्यद हाजी याला हैदराबाद येथे अटक केली होती. हैदराबाद, पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने त्याला अटक केली. मूळचा धर्माबादचा असलेल्या सय्यद मकबूलची संपूर्ण शहरात दहशत होती. गेल्या १६ सप्टेंबरला क्षुल्लक कारणावरून त्याने धर्माबादचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पोलीस दलात कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या कोळेकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणावरून गुन्हाही दाखल केला होता. सय्यद मकबूलची वर्तणूक व हालचाली संशयास्पद वाटल्याने कोळेकर यांनी त्याची इत्यंभूत माहिती मिळवली. तो काय करतो? कोणाच्या संपर्कात असतो? त्याचा व्यवसाय काय? त्याची ऊठबैस कुठे आहे? याची माहिती मिळाल्यावर कोळेकरांचा संशय आणखी बळावला. सय्यद मकबूल दहशतवादी कारवायात सहभागी असल्याचे कोळेकर यांना त्याच्या कुंडलीवरून कळाले. आंध्र प्रदेशातल्या बोधन येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाची त्याने १९९९मध्ये हत्या केली होती. या प्रकरणात आंध्रातील न्यायालयात त्याला शिक्षाही झाली होती. सात वर्षे शिक्षा भोगल्यानंतर आंध्र सरकारने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करीत त्याची शिक्षा माफ केली होती. त्यानंतर धर्माबाद येथे काही काळ वास्तव्यास आलेल्या सय्यद मकबूलने १६ सप्टेंबरला दूरध्वनीवर चक्क पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिली.
सय्यद मकबूलची धमकी जिव्हारी लागलेल्या कोळेकर यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्याचे फोन टॅपिंग करण्याची परवानगी मागितली. तत्कालीन प्रभारी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आपला शेरा देऊन कोळेकर यांचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. मात्र, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय हा प्रस्ताव फेटाळला. हा प्रस्ताव त्याच वेळी मंजूर झाला असता, तर सय्यद मकबूलच्या हालचाली धर्माबाद पोलिसांना कळाल्या असत्या व त्याच्या मुसक्या आवळणे अवघड गेले नसते. उल्लेखनीय म्हणजे सय्यद मकबूलच्या हालचाली, तसेच त्याचा संपर्कात येणाऱ्या तरुणांचीही धर्माबाद पोलिसांना माहिती झाली असती.
एक कुख्यात गुन्हेगार दिल्ली ऐवजी नांदेड पोलिसांच्या हाती केव्हाच लागला असता. एखाद्या संशयिताचे फोन १५ दिवसांपर्यंत टॅप करण्याचे अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षकांना आहेत.
अधिक कालावधीत फोन टॅप करायचा असेल तर गृहसचिवांची परवानगी लागते. नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनीच फोन टॅप परवानगी नाकारल्याने हतबल झालेल्या धर्माबाद पोलिसांनी पुढे या संदर्भात कोणताही पाठपुरावा करण्याचे धाडस दाखवले नाही.
धर्माबाद पोलिसांची विनंती त्याच वेळी मान्य केली असती, तर पुणे बॉम्बस्फोटाची माहिती पोलिसांना पूर्वीच मिळाली असती, शिवाय हैदराबादच्या दिलसुखनगर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट कटाची पूर्वकल्पना पोलिसांना मिळू शकली असती. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव का नाकारला? हे स्पष्ट झाले नाही. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध न झाल्याने त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही परवानगी नाकारल्यानंतरही त्याबाबत ‘ब्र’ न काढणाऱ्या नांदेड पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दक्ष असल्याचा दावा केला. आमच्या रडावर अनेकजण आहेत. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाईही सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.