प्रथमेश गोडबोले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात शिक्षणाबरोबरच उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उलाढालीमुळे शहरीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, रेंगाळलेल्या प्रकल्पांमुळे नियोजनाचा अभाव दिसत आहे. मेट्रोचा प्रकल्प अद्याप पूर्णत्वाला गेला नसून, पुण्याला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळही मिळू शकले नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. जिल्ह्यात लहान-मोठी तब्बल २५ धरणे असली, तरी नियोजनाची वानवा असल्याने उन्हाळय़ाची चाहूल लागताच पाण्याचे संकट दर वर्षी उभे राहत आहे.

पुणे हे उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे राज्यात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पूर्वेकडील ऑक्सफर्ड, विद्येचे माहेरघर, आयटी हब अशा विविध नावांनी परिचित असलेल्या पुणे शहराची चौफेर शहरीकरणाकडे वाटचाल सुरू असताना, नियोजनाच्या अभावामुळे उर्वरित जिल्ह्याच्या विकासाचा वेग मात्र मंदावला आहे.

स्वतंत्र विमानतळाची प्रतीक्षाच

सध्या पुण्यासाठी एकच विमानतळ आहे. लोहगाव विमानतळावरून दररोज सरासरी ८५ विमानांचे उड्डाण होते. प्रवाशांची सरासरी संख्या दररोज २१ ते २४ हजार आहे. सध्याच्या टर्मिनलची वार्षिक प्रवासीक्षमता ७० लाख आहे. हे विमानतळ हवाई दलाच्या जागेत असल्याने विस्तारात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या विमानतळाच्या प्रकल्पाला होणारा विरोध आणि प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने हा प्रकल्प लालफितीत अडकला आहे.

मेट्रोची संथगती

पुण्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर मेट्रो धावत असली, तरी तिला अपेक्षित प्रतिसाद नाही. अद्याप या मार्गावरील कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. शिवाजीनगर ते हिंजवडी हा आणखी एक मेट्रो मार्ग करण्याचे नियोजन आहे. मात्र, त्याला अद्याप गती आलेली नाही.

रेल्वे स्थानकाची आवश्यकता

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, स्थानकाच्या आणखी विस्तारासाठी आता पुरेशी जागा उपलब्ध नाही. जिल्ह्यात इतर कोणतेही मोठे स्थानक नसल्याने एकाच स्थानकावर सर्व ताण येतो. दुसरे पर्यायी मोठे स्थानक विकसित करण्यात अद्याप यश आलेले नाही.

वाढती लोकसंख्या आणि पाणी प्रश्न

जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी २१ लाख ७९ हजार ८०३ एवढी असून, शहराची ५० लाख ५० हजार ७०९, पिंपरी-चिंचवडची २४ लाख ९५ हजार ४७१, तर ग्रामीण भागाची लोकसंख्या ४६ लाख ३३ हजार ६२३ एवढी आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १५ हजार ६४३ चौ. कि.मी आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण ३०.३७ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, घोड, मीना, कुकडी, पुष्पावती, पवना, रामनदी या नद्या असून, २५ धरणे आहेत. मात्र, उन्हाळय़ात पाणीकपातीचे संकट कायम असते.

आरोग्यसेवेची चांगली कामगिरी

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे १०१, उपकेंद्र ५४६, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये २८ आहेत, तर आयुर्वेदिक दवाखाने १३ असून, तीन फिरते दवाखाने आहेत. आरोग्य पथकांची संख्या ११ आहे. जिल्ह्यात खासगी पाच आणि दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही आरोग्यसेवा कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, त्यानंतर सरकारी आणि खासगी आरोग्यसेवेत वाढ झाली असल्याचे चित्र आहे.

विद्येचे ‘माहेरघर’

 पुणे  हा शिक्षणाच्या क्षेत्रातील आघाडीवरील जिल्हा मानला जातो. २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (नॅस) जिल्ह्यातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषा आणि गणित या विषयांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या सरासरीच्या जवळपास कामगिरी केल्याचे निदर्शनास येते. जिल्ह्यातील आठवीच्या विद्यार्थ्यांची गणितातील पायाभूत ज्ञानाची सरासरी ६२ होती, तर राज्याची सरासरी ५८ होती. त्याशिवाय टक्केवारीचे अपूर्णाक-दशांशात आणि अपूर्णाक-दशांशाचे टक्केवारीत रूपांतर करण्यात जिल्ह्याची सरासरी २९, तर राज्याची सरासरी ३० होती.

उद्योग क्षेत्रावर सावट

जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या दोन लाख ३४ हजार ६७७ असून, त्यांत साडेसोळा लाख कामगार कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड, इंदापूर, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, बारामती, रांजणगाव, हिंजवडी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. ४५० मोठे माहिती तंत्रज्ञान युनिट असून नोंदणीकृत लहान आयटी युनिट १४०० आहेत.  पुण्यात विविध ठिकाणी ७२ आयटी पार्क आहेत. मात्र, यातील काही उद्योग  बंद पडत असल्याने बेरोजगारीची समस्याही उभी राहू लागली आहे.

कृषी क्षेत्रात विकासाच्या पाऊलखुणा

जिल्ह्यात फळशेतीची वेगाने वाढ होत आहे. रब्बी, खरीप हंगामातील पिकांऐवजी फळशेतीला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात केळी, सीताफळ, अंजीर, द्राक्षे, पेरू, आंबा, पपई, किलगड, डाळिंब यांसह आवळा, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, संत्री आणि मोसंबीची लागवड करण्यात येते. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) यांसारख्या योजनांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाची वाढ होत आहे. कृषी उद्योगातील पथदर्शी जिल्हा म्हणून पुणे नावारूपाला आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune lack of planning development rapid urbanization ysh
Show comments