पुणे महानगरपालिकेमध्ये काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पार्किंग पॉलिसी मंजूर करण्यात आली. या पॉलिसीच्या विरोधात आज पुणे महापालिकेत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असून त्यांनी चक्क महापौरांच्या गाडीचीच पार्किंगची पावती फाडून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपने पार्किग पॉलिसी मंजूर केल्याने विरोधक एकवटल्याचे पाहावयास मिळत असून आज महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या मांडून निषेध व्यक्त केला. तर त्या पाठोपाठ मनसेने महापालिकेच्या आवारात महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले या तिन्ही प्रमुख नेत्याच्या चार चाकी वाहनाला पार्किंग पॉलिसीचा फलक लावून निषेध नोंदविला आहे.

या आंदोलनात मनसे नगरसेवक साईनाथ बाबर, शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसे गटनेते वसंत मोरे म्हणाले की,सताधारी भाजपने महापालिकेत सत्ता येऊन वर्षांचा कालावधी झाला. या दरम्यानच्या कालावधीत नागरी हिताचा निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरले असून ही निषेधार्थ बाब आहे.

पुणेकर नागरिकांनी भाजपाला एक खासदार, आठ आमदार आणि महापालिकेत भाजपला सत्ता दिली असताना त्यांनी पार्किंग पॉलीसीला मंजुरी देऊन एक प्रकारे सूड उगवला आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली. येत्या काळात हा विषय सभेपुढे आल्यावर त्याला तीव्र विरोध दर्शवणार असल्याची टीका त्यांनी केली.

पुणे महानगरपालिका पे अँड पार्क फक्त चार चाकी वाहनांसाठी १० रुपये शुल्क, कॉन्ट्रॅक्टर भारतीय जनता पार्टी, पुणे शहर, ठिकाण पुणे महानगरपालिका, पावती क्रमांक ४२० आणि सौजन्य सर्व नगरसेवक आणि नगरसेविका भाजप पुणे शहर असा मजकूर फलकावर होता. या मजकूराकडे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधल्याचे पाहावयास मिळाले.

Story img Loader