सांगली : पुणे पोलिसांनी बुधवारी अंमली पदार्थाचा साठा केल्याच्या संशयावरून कुपवाडमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकल्या असून चौकशीही सुरू केली आहे. मात्र, या ठिकाणी संशयास्पद काही आढळले की नाही याबाबत काहीही माहिती सायंकाळपर्यंत मिळू शकली नाही. पुणे पोलिसांनी पुणे व दिल्लीमध्ये छापे टाकून कोट्यावधीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थाचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली.
बुधवारी दुपारपासून पुणे पोलिसांनी सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा, बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या तीन ठिकाणी छापे टाकून काही संशयास्पद माल हस्तगत केला असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी १० किलो एमडी हा अंमली पदार्थ मिळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिठाच्या पाकिटातून हा अंमली पदार्थ कुरियरमार्फत पाठविण्यात येणार होता अशीही माहिती मिळाली आहे. अजूनही काही प्रमाणात एमडी अंमली पदार्थ या परिसरात मिळण्याची पोलीसांना शक्यता वाटत आहे.
हेही वाचा…सांगली : मिरजेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा केंद्राकडे प्रस्ताव
मात्र, या छाप्याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत असून अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. कुपवाडमध्ये एमडीसारख्या अंमली पदार्थांचे उत्पादन करून ते मोठ्या शहरात विक्रीसाठी कुरियरमार्फत पाठविण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.