दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद सध्या देशभर उमटत आहेत़  देशभरातील तरुणाई या प्रकरणाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरत आह़े  मात्र तीन वर्षांपूर्वी थरकाप उडवून देणाऱ्या पुण्यातील आयटी व्यावसायिकेच्या अशाच एका पाशवी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे सर्वानाच विस्मरण झाले आह़े  या प्रकरणातील पीडित महिलेचे पती अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़
ऑक्टोबर २००९ मध्ये खराडी येथील सिंक्रोन टेक्नॉलॉजी या आयटी कंपनीत काम करणाऱ्या नयना पुजारी या २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता़  कार्यालयाबाहेरून तिला लिफ्ट देणाऱ्या गाडीचा चालक आणि अन्य तीन जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती़  परंतु, त्यापैकी मुख्य आरोपी योगेश राऊत याने ससून रुग्णालयातून १५ महिन्यांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता़  यात त्याला पोलीसांनीच साहाय्य केल्याचा आरोप होत आह़े  त्याला अटक करणे पोलिसांना अद्याप यश आलेले नाही़
दरम्यान, आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करता यावेत, म्हणून नयनाचे रसायनशास्त्र अभियंता असलेले पती अभिजीत पुजारी(३२) यांनी आपली नोकरी सोडली आह़े  आता ते पूर्ण वेळ या खटल्यावर लक्ष ठेवून आहेत़  पोलिसांच्या तावडीतून निसटलेला मुख्य आरोपी योगेश राऊत याला पुन्हा अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अभिजीत यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांपासून ते केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचे उंबरटे झिजवले आहेत़  या आरोपीच्या शोधार्थ विशेष पथक स्थापन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आह़े  परंतु, राऊत अद्यापही फरारच आह़े  अटकेत असणाऱ्या एक आरोपी माफीचा साक्षीदार झाला असून त्याने आपला जबाबही नोंदविला आह़े  मात्र मुख्य आरोपीच फरार असल्याने खटला रेंगाळला आह़े
आता काय करावं तेच मला कळत नाही़  बलात्काराची नवी एखादी घटना समोर आली की, याबाबतचे कायदे कठोर करण्याची आणि जलद गती न्यायालयाची चर्चा सुरू होत़े  मला मात्र त्यात काही तथ्यच आढळत नाही़  पोलीस यंत्रणा किती अपयशी आहे हे सिद्ध करण्यासाठी माझे उदाहरण पुरेसे आह़े  ताब्यात असलेला आरोपी पोलिसांना राखता आला नाही किंवा त्याला परत अटक करण्यातही ते अपयशी ठरत आहेत़  कसं हाताळावं या यंत्रणेला, असा पुजारी यांचा संतप्त सलाव आह़े      
गुजरातमध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार
दिल्ली बलात्काराच्या भयंकर घटनेतील पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून होत असताना तसेच राजधानीत उग्र आंदोलने सुरू असताना देशभरात झालेल्या या गुन्ह्य़ांच्या पुनरावृत्तीमुळे परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. गुजरातमध्ये अडीच वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या काकावरच गुन्हा नोंदवला आहे.
पश्चिम बंगालमध्येही निर्घृण कृत्य
पश्चिम बंगालमधील बरद्वान जिल्ह्य़ातील एका गावातही अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला झुडपात फेकून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. गोआई गावात एका महिलेला सोमवारी झुडपामध्ये लहानग्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शोधाशोध केल्यानंतर या झुडपांमध्ये तीन वर्षांची बालिका जखमी अवस्थेत आढळली. या महिलेने तातडीने तिला कटवा येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हैदराबादमध्ये  बालक अत्याचाराचे बळी
हैदराबादजवळच्या पथ्रिका येथेही साडेचार वर्षांची एक लहानगी एका नेपाळी तरुणाच्या अत्याचारांना बळी पडली. या तरुणाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्य़ातील ऐनोली गावात ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर रविवारी बलात्कार झाला, मात्र ही घटना मंगळवारी उघडकीस आली. या मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही.
सामूहिक बलात्कार
मध्य प्रदेशमध्येही एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण उघड आले आहे. सागर जिल्ह्य़ातील जिल्हा रुग्णालयात मुलाच्या उपचारासाठी आलेल्या एका महिलेवर रुग्णालयातील तीन सफाई कामगारांनी बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली.