पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला जुन्नर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात करोना प्रतिबंधक नियमांना हरताळ फासण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या प्रकरणी आता जुन्नर पोलिसांकडून देवराम लांडे यांच्यावर २४ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फक्त दोनशे जणांची परवानगी असताना तब्बल दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्न सोहळ्यामुळे देवराम लांडे अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन शिवसैनिकच पाळत नाहीत अशी देखील टीका यानिमित्ताने पुन्हा एकदा होऊ लागली आहे.
जुन्नर पोलिसांकडून याप्रकरणी २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता ते लग्न कार्यालय सील करण्याची कारवाई देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असताना देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर आता ते शिवसेनेत आहेत. या लग्नसोहळ्यात जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते अशी माहिती मिळते. दरम्यान, या प्रकरणी बसलेल्या कारवाईच्या दणक्यानंतर आता देवराम लांडे यांनी याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी गेल्या २५ वर्षांपासून माझ्या ओळखीतील गोरगरीबांच्या लग्नाला जात होतो. त्यामुळेच प्रेमापोटी ती लोकं देखील आली”, असं लांडे म्हणाले.
आणखी वाचा- शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात दोन हजार वऱ्हाडी, करोना नियमांचा फज्जा
नियोजन थोडसं फसलं!
आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्यात झालेल्या करोना नियमांच्या उल्लंघनासंदर्भात बोलताना देवराम लांडे म्हणाले कि, “मी लोकांना आवाहन केलं होतं की गर्दी करु नका. तरी मी आदिवासी भागातील कार्यकर्ता असल्याने लोकांनी लग्नाला अचानक येण्यास सुरुवात केली. मी गेल्या २५ वर्षांपासून माझ्या ओळखीतील गोरगरीबांच्या लग्नाला जात होतो. त्यामुळेच प्रेमापोटी ती लोकं देखील आली. मी पत्रिका पण कमी वाटल्या होत्या. डीजे वाजवला नाही. साधेपणाने करण्याचा खूप प्रयत्न होता. मात्र, लोकांचा आग्रह होता. आहेराचा कार्यक्रम आमच्याकडे असतो. त्यानुसार नियोजन होतं. पण ते नियोजन थोडसं फसलं.”