Pune Rape Case Live Updates : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचंही बक्षिस जाहीर केलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, या प्रकरणातील सर्व ताजे अपडेट्स जाणून घ्या.
Pune Swargate Rape Case LIVE Update : पुणे बलात्कार प्रकरणातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घ्या
Pune Rape Case : दत्तात्रय गाडेचा अजित पवारांच्या आमदाराशी संबंध? ज्ञानेश्वर कटके म्हणाले...
आरोपी शिरूर तालुक्यात राहणारा आहे. तो मतदारसंघ माझा असल्याने अनेकजण मला येतात आणि फोटो काढतात. पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. दिवसभरात असे अनेकजण भेटत असतात. विकृती असलेल्या अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे- ज्ञानेश्वर कटके, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
Pune Rape Case Update : महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक
महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राहणार उपस्थित
पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकेशननुसार त्याला फॉलो केलं जातंय. त्याचं संभाव्य लोकेशनही आपल्याकडे आहे. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एक असा गैरसमज तयार केला जातोय, परवा सकाळी घटना घडली, ती कालपर्यंत का कळवली गेली नाही? ज्यावेळेला फिर्याद आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच आरोपीला ओळखलं. तो अलर्ट होऊ नये म्हणून ही माहिती बाहेर दिली गेली नाही. जर माहिती आधीच बाहेर दिली असती तर आता जे संभाव्य लोकेशन सापडलं आहे ते मिळालं नसतं. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. फक्त गुप्तता पाळण्यात आली आहे - योगेश कदम, गृहराज्यमंत्री
पुणे शहराच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती एसटी स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांमार्फत रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजल्यापर्यंत कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पीआय फेरी मारून गेल्याचं दिसतंय. पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नाही. पोलीस अलर्ट नव्हते असंही नाही. आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत. घटना घडली तेव्हा आजूबाजूला माणसं होते - योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Pune Rape Case : "सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर", पुण्यातील घटनेनंतर शिवसेनेकडून सरकारवर टीका
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये परवा एका तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, यामुळे विरोधी पक्षांचे नेते राज्य सरकारवर टीका करत आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी, "राजकीय कार्यासाठी आणि सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर केला जात आहे" असा आरोप केला आहे.
Pune Rape Case : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली.या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) हा आरोपी फरार असून त्या आरोपीच्या शोधासाठी 13 पथक रवाना करण्यात आली आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्थानकात येताच, भूमाता ब्रिगेड च्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यावर तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
Pune Rape Case : गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्थानकात दाखल
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) हा आरोपी फरार असून त्या आरोपीच्या शोधासाठी 13 पथक रवाना करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्थानकात आले आहेत.
Pune Swargate Rape Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वारगेट येथे आंदोलन
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली.या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) हा आरोपी फरार असून त्या आरोपीच्या शोधासाठी 13 पथक रवाना करण्यात आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट एसटी स्थानका बाहेर आंदोलन करण्यात आले.
दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस पुणे पोलिसांकडून जाहीर

Pune Rape Case Update : गृहखातं लाडक्या बहिणींसाठी वापरलं तर उपकार होतील, संजय राऊतांची टीका
शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतील निर्भयाकांड सारखा आहे. सुदैवाने पीडितेचे प्राण वाचले. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केले. वसंत मोरे, संजय मोरे आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्यावर आता गुन्हे दाखल होतील. पुण्यातील मोकाट सुटलेल्या गँगना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री राजकीय कार्यासाठी गृहखाते वापरत आहेत. यातून विरोधकांना त्रास दिला जात आहे. पण गृहखाते लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी वापरले, तर महाराष्ट्रावरती उपकार होतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Pune Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
Pune Rape Case : ‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून आणखी काही गुन्हे ? पसार आरोपीच्या शोधासाठी १३ पथके रवाना
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
Pune Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…
स्वारगेट बस स्थानकात महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या बसस्थानकातील सुरक्षिततेचे सर्व उपाय कुचकामी असल्याचे आढळले आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना पोलीस गस्तीचा अभाव आहे, तर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी चक्क आकाशावर आहे.
Pune Swargate Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून मोठं बक्षिस, पकडून देणाऱ्याला मिळणार ‘इतके’ लाख!
सराईत गुन्हेगार असलेल्या तरुणीशी गोड बोलून तिच्यावर स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकरणी आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी १३ पथके तैनात करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नसल्याने पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला बक्षिस जाहीर केलं आहे.
Pune Swargate Rape Case LIVE Update : पुणे बलात्कार प्रकरणातील लेटेस्ट अपडेट्स जाणून घ्या