Swargate Pune Rape Case Dattatray Gade Arrested: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला!
अशी झाली तपासाला सुरुवात…
बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी उभी असलेली ही बस पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली. या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. सदर तरुणीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू असून तिचा जबाबही घेण्यात आला. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आलं. यात आरोपी दत्तात्रय गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचं, तसेच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं दिसून आलं.
आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बसस्थानकांमध्ये चोऱ्या, पाकिटमारी आणि तत्सम गुन्हे करण्यात याआधीही तो पोलिसांच्या रडारवर आला होता, अशी माहिती समोर आली. पीडित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकं तैनात केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं.
मोबाईल लोकेशनचा शोध..
आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. मात्र, तो घरी नसल्याचं दिसून आलं. त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला. आरोपीने गेल्या काही दिवसांन फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात होती. पोलिसांना गुरुवारी सूत्रांकडून आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूरमधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांची १० पथकं दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली. गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते.
रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्यानी पोलिसांना फोन करून दिली. यावेळी गाडेनं आपल्याला शरण जायचं असल्याचंही सांगितलं. तिथून गाडे गावातल्याच एका उसाच्या शेतात जाऊन लपल्याचं पोलिसांना समजलं. त्यावेळी पलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने दत्तात्रय गाडेला शोधण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेताना दिसत होता.
..अखेर दत्तात्रय गाडेला अटक झाली!
“ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे. तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये. पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत”, अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती. अखेर दत्तात्रय गाडे कुठे लपून बसलाय हे पोलिसांना समजलं. पोलिसांनी दत्तात्रय गाडेशी ड्रोनच्या माध्यमातून संवाद साधला. आपण तिथे पोहोचत असल्याचं त्याला सांगितलं. तसेच, “तू घाबरू नकोस”, असा दिलासाही पोलीस त्याला देत होते. आपण बोलल्यानंतर गाडे कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा राहिल्याचंही शोध घेणाऱ्या एका पोलिसानं नमूद केलं.
डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला. अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि मध्यरात्रीच लष्कर पोलीस स्थानकात त्याला ताब्यात घेण्यात आलं.