उच्च शिक्षणातील अभिनवतेसाठी पुणे विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘बेस्ट इनोव्हेशन इन टीचिंग’ पुरस्कार नाशिकच्या हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिता विवेक गोगटे यांना जाहीर झाला आहे.
१० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत शहरी विभागात अव्यावसायिक अभ्यासक्रमातील उत्कृष्ट अभिनवतेबद्दल डॉ. गोगटे यांना हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार १० फेब्रुवारीला विद्यापीठ स्थापना दिनाच्या सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. डॉ. गोगटे गेल्या ३० वर्षांपासून अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत. बीवायके महाविद्यालयात पुनर्रचित अभ्यासक्रमात त्यांचे लक्षणीय योगदान होते. हंप्राठा महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबविले. त्यात प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसंकल्प सोपा करून सांगणे, अर्थशास्त्रातील क्लिष्ट संबा सिद्धान्त, याच माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत नेणे, आर्थिक क्षेत्रातील ताज्या घडामोडींची नोंद घेणारे फलक-लेखन, अशा उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. गोगटे यांनी नवमाध्यमांचाही उपयोग केला. त्यांच्या या यशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, विभागीय सचिव प्रा. देवराज, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे आदींनी अभिनंदन केले.

Story img Loader