ऊसतोडणी टोळ्या, मुकादम यांच्याकडून ऊसतोडणी यंत्रणेसाठी करण्यात येणारे करार न पाळल्याने राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सन २००४ पासून २०२० पर्यंत ८१ साखर कारखान्यांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक कारखान्यांनी साखर आयुक्तालयाने तयार केलेल्या मोबाइल उपयोजनमध्ये (ॲप) वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी;

साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार हे मोबाइल उपयोजन साखर आयुक्तालयाने विकसित केले आहे. त्यामध्ये ही माहिती संकलित करण्यात येत आहे. या उपयोजनमुळे एकूणच ऊस तोडणीच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येत आहे. राज्यात एकाचवेळी २०० साखर कारखाने सुरू असतात. या कारखान्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी ऊस गाळप होत असल्यामुळे आणि प्रत्येक हंगामापूर्वी साखर कारखाने वाहतूकदारांबरोबर ऊसतोडणी यंत्रणेसाठी करार करतात. अन्य कारखान्यांमध्ये देखील तेच वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेऊन आणि रक्कम बुडवून कारखान्यांची फसवणूक होत असल्याचे कारखान्यांच्या संकलित माहितीवरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कधी?; रखडलेले उड्डाणपूल, नागरिक हैराण

गेल्या वर्षीच्या सन २०२१-२२ च्या हंगामात आगाऊ रक्कम देऊन करार केला आणि प्रत्यक्षात संबंधित मुकादमांनी दुसऱ्या कारखान्यांबरोबरही करार केल्याचे स्पष्ट झाले. असे २५० ते ३०० कामगार निदर्शनास आले आहेत. उपयोजनमध्ये सर्वच कारखान्यांनी माहिती भरल्यास कारखान्यांची होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होणार आहे. ऊस तोडणी, गाळप प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून परिश्रम घेण्यात येत आहेत. त्याकरिता तयार करण्यात आलेल्या उपयोजनमध्ये शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, कारखानदार यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत, असेही गायकवाड यांनी सांगितले.

टोळ्यांच्या पुरवठा न झाल्याने पोलिसांकडे तक्रार –

राज्यात दहा लाखांच्या आसपास ऊसतोडणी कामगार, ५५ हजार वाहन मालक आणि ५० ते ५५ हजार मुकादम कार्यरत आहेत. त्यामध्ये २०२१-२२ करीताच्या नोंदीत माहिती पाहता ३८ हजार ९६७ वाहनधारक, दोन हजार ४० मुकदाम यांनी माहिती भरली आहे. तसेच ४१५३ लोकांनी उपयोजनचा वापर केला असून ही संख्या चालू वर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी ऊस तोडणीसाठी साखर कारखाने मुकादम आणि ऊस तोडणी टोळी प्रमुखांना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल रक्कम देतात. प्रत्यक्षात रक्कम घेऊनही तोडणीस टोळ्यांचा पुरवठा न होण्यामुळे कारखाने पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Story img Loader