समस्या सोडविण्यासाठी सक्षम नसताना नव्याने २८ गावांचा पुण्यात समावेश करून घ्यायचा निर्णय का घेतला?.. झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनाचे गाजर तर दाखविले पण पुढे काहीच का झाले नाही?.. पुण्यातले रस्ते बकाल का?.. वाहतूक व्यवस्थापनाचे बारा का वाजले?.. धरणे ९५ टक्के भरूनही पुणेकरांना कायम तहानलेलेच ठेवणार का?.. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बाँबस्फोटांनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत वाद घालण्यापेक्षा मुळात सुरक्षिततेचा विचार कधी होणार?.. पुणेकरांचे आक्रमक प्रश्न आणि उत्तरादाखल बचावाचा प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी! ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेल्या आणि ‘झी चोवीस तास’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपलं शहर आपला आवाज’ या कार्यक्रमात दिसलेले हे चित्र.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विकास मठकरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरोधी पक्ष नेते वसंत मोरे, रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पाणीप्रश्नाबाबत बोलताना जगताप म्हणाले, ‘‘या वर्षी पाऊस लांबला हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. धरणे शंभर टक्के भरली नाहीत. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आज कमी पाणी द्यावे लागते.’’ तर ‘पुण्याचे पाणी बारामती आणि इंदापूरच्या साखर कारखान्यांसाठी तसेच मद्य कारखान्यांसाठी जाते’असा आरोप मठकरी यांनी केला.
पुण्याच्या वाहतूक व्यवस्थापनाविषयी चर्चा करताना, बस खरेदी डाव्या आणि उजव्या दारात कशी अडकली यावरून लोकप्रतिनिधींची पुन्हा एकदा जुंपली. टँकरमाफियांचे हितसंबंध जपण्यासाठी पाण्याचे ऑडिट टाळले जाते का, नवीन विकास आराखडा लागू होताना उद्यानांची आरक्षणे, शहराची सुरक्षितता आदी प्रश्नांवर  लोकप्रतिनिधींमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा