पनवेलमधून १०२ वर्षांपासून पुणेकर कुटुंब वाद्य निर्मिती करतं आहे. या दुकानात बनवण्यात आलेल्या वाद्यांची विक्री महाराष्ट्रात होते. पनवेलमध्ये १९१९ पासून हे दुकान आहे. ‘पुणेकर’ कुटुंब १०२ वर्षांपासून म्हणजेच मागच्या चार पिढ्यांपासून हे दुकान चालवतं आहे. या दुकानात आजच्या घडीलाही हातानेच वाद्य निर्मिती केली जाते. कुठलंही काम मशीनने केलं जात नाही. दुकानात वाद्यांच्या निर्मितीसह वाद्यांच्या दुरुस्तीचीही कामं केली जातात. गणेश उत्सव आणि श्रावण महिना म्हटलं विविध आरत्या म्हटल्या जातात आणि त्या आरत्यांना साथ असते ताल वाद्यांची. याच वाद्यांची निर्मिती पनवेलमधले पुणेकर बंधू करत आहेत. त्यांच्या दुकानात ढोलकी, मृदुंग, तबला अशी विविध वाद्यं मिळतात. विशेष बाब म्हणजे ही वाद्यं हाताने तयार केली जातात. जय मल्हार म्युझिकल असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे.
प्रवीण पुणेकर यांनी काय म्हटलं आहे?
१९१९ पासून आमचं हे दुकान आहे. आमचे पणजोबा, आजोबा, वडील आणि काका या व्यवसायात होते. आता आमची चौथी पिढी काम करते आहे. बारा महिने आमचं दुकान सुरु असतं. मात्र मृदूंग, ढोलकी यांना मागणी गणपती आणि श्रावण महिन्यात जास्त होते. १०२ वर्षे हा व्यवसाय अविरतपणे आम्ही करतो आहोत. असं प्रवीण पुणेकर यांनी सांगितलं. गणपतीच्या काळात वाद्यांची मागणी जास्त असते. मृदुंगात चामडं असतं, लाकूड असतं आणि त्याच्या सहाय्याने आम्ही ही वाद्य तयार करतो. साधारण ३ हजारांपासून पुढे आम्ही वाद्यं विकतो. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही मागणी आहे असंही त्यांनी सांगितलं.
ज्ञानेश्वर पुणेकर यांनी काय सांगितलं?
आमच्या चार पिढ्या हा व्यवसाय करत आहेत. पणजोबा, आजोबा, बाबा आणि काका आणि आम्ही दोघं भाऊ असं आम्ही या व्यवसायात आहोत. १२ महिने व्यवसाय करतो. कोकणात गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण आहे. गणपतीच्या आरतीला वाद्य वाजवलं पाहिजे असं अनेकांना वाटतं त्या प्रमाणे वाद्यं विकत घ्यायला लोक येतात. लाकडाच्या खोडापासून वाद्यं तयार करतो. आम्ही मशीनचा वापर करत नाही. ढोलकी, तबला, पखवाज, मृदुंग यांची खोडंही वेगळी असतात. यावर्षीही लोक चांगला प्रतिसाद देत आहेत असं ज्ञानेश्वर पुणेकर यांनी सांगितलं.