सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने शुक्रवारी (१२ मे) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभक्त असल्याने मला शिक्षा दिली जात आहे, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली.
खरं तर, समीर वानखेडे हे २०२१ पासून चर्चेत आहेत. त्यांनी २०२१ मध्ये मुंबईतील एका क्रूझवर छापेमारी केली होती. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून सीबीआयने समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सुमारे २९ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
‘इंडिया टुडे’ला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले, “सीबीआयने काल माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे.”
हेही वाचा- सीबीआयच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे कोण? आर्यन खान प्रकरणात काय झाले होते आरोप?
“सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला, पण त्यांना काहीही सापडलं नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकाने माझ्या सासरच्या मंडळींच्या घरीही छापेमारी केली. माझे सासू-सासरे दोघंही वृद्ध आहेत,” असंही समीर वानखेडे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईतील कोर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. यावेळी त्यांनी आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणातून आर्यन खानला सुखरूप सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ लाखांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला असून त्याच्याविरोधात एकही पुरावा आढळला नाही.