अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने त्यांचे जीवन व कार्याची माहिती देणारा श्रीक्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा १० मार्च तयार करावा. आराखडा तयार होताच मुख्यमंत्र्यासमवेत त्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी चौंडी येथे श्रीक्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्यासाठी आढावा बैठकीत ही सूचना आज, गुरुवारी केली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.

सध्या श्रीक्षेत्र चोंडी येथे सुरु असलेली सर्व विकासकामे २ महिन्यात पूर्ण करण्याची सूचना सभापती शिंदे यांनी केली. अहिल्यादेवींनी कृषी, व्यापार विकास, आदर्श राज्यकारभार, धार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदींना प्राधान्य दिले. देशातील १२ ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या देशभरातील कार्याचा इतिहास एकत्र करून ऐतिहासिक वारसा व आध्यात्मिक भावनेची जपणूक होईल यादृष्टीने त्याची प्रतिकात्मक स्वरूपात संग्रहालयातून मांडणी करण्याची सूचना त्यांनी केली.

विकासकामांसाठी चौंडी परिसरातील शासकीय जमिनीची पाहणी, मोजणी करून त्याचा नकाशा तातडीने तयार करावा. बाराही महिने पाणी उपलब्धता राहील, यासाठी नदी पुनरुज्जीवन व संवर्धनाचा समावेश आराखड्यात करावा. चौंडीकडे येणारे रस्ते प्रशस्त व मोठे राहतील याची काळजी घ्यावी आदी सूचनाही त्यांनी केल्या.

चौंडी गावाच्या विकासासाठी सध्या प्रादेशिक पर्यटन व ग्रामविकास विभागाची मुलभुत सुविधा पुरविणे या दोन योजनेतून एकुण २४ कोटी ११ लाख रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेतून ९ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण, नक्षत्र उद्यान, संरक्षण भिंत, उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प, मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय, सिना नदीवर पश्चिम बाजूस घाटाचे बांधकाम आदींना मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास विभागाकडील संग्रहालय बांधकाम, नदीकाठी घाट बांधकाम व सुशोभिकरण, दोन स्वागत कमानी यासाठी निधी मंजूर झाला आहे.

Story img Loader