सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आगामी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा २५१ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात २०५ कोटी ६ लाख ८२ हजार रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा गृहीत धरण्यात आली असून त्यात ४६ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या वेळी वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे यांनी अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पातील तरतूद केलेल्या तरतुदी अशा : शिक्षकांच्या संशोधनास चालना मिळण्यासाठी बीज भांडवल संशोधन उपक्रम-३५ लाख, मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी मुली शिकवा, समाज घडवा उपक्रम-५ लाख, कमवा व शिका योजना-१५ लाख, विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक कोटी, विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना-२० लाख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष साजरा करण्यासाठी ७५ लाख, विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिसंवादासाठी १० लाख, नावीन्यपूर्ण कल्पना, उष्मायन आणि दुवे यासाठी विद्यापीठाचा हिस्सा-५० लाख याप्रमाणे विविध आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

या वेळी राजा सरवदे, सचिन गायकवाड, महादेव कमळे, समाधान पवार, डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. भगवान आदटराव, रोहिणी तडवळकर, गणेश डोंगरे, अजित संगवे, चन्नवीर बंकुर, डॉ. जैनोद्दीन मुल्ला, ॲड. उषा पवार, सूरज रोंगे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. सीमा गायकवाड आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

Story img Loader