सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा लोकसभेची जागा महायुतीने आरपीआयला सोडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. १९९६च्या निवडणुकीत येथून शिवसेनेचा खासदार निवडून आला होता. तर मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात २ लाख ५५ हजार मते मिळाली होती. त्या वेळच्या व आत्ताच्या राजकीय परिस्थितीत खूपच फरक पडला आहे. सध्याचे राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधातील अनेक छुपे विरोधक पुरषोत्तम जाधव यांना पाठिंबा देणार असल्याचे जाधव यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांनी जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाईला जाधव यांच्या उमेदवारीबाबत झालेल्या बैठकीला भाजपाचे जिल्हय़ातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आज मुबंईतील शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पुरुषोत्तम जाधव मुंबई येथे गेले होते. शिवसेना भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम जाधव यांना महायुतीच्या निर्णयाविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. पक्ष प्रमुखांना सातारची जागा पुन्हा मागण्याची विनंती शिवसेना-भाजपाच्या पदाधिका-यांनी आज मुंबई येथे केली आहे. या मागणीला यश येणार नसल्याने महायुतीच्या निर्णयाविरोधात बंडखोरी करून उदयनराजे भोसलेंच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Story img Loader