शैक्षणिक विस्ताराबरोबर गुणात्मक दर्जा वाढला पाहिजे. कर्मवीर अण्णांनी त्या काळात शिक्षण प्रसाराची पहिली पायरी म्हणून शाळांची स्थापना केली होती. मात्र आता केवळ शिक्षण प्रसाराबरोबर किंबहुना त्यापुढे जाऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे शैक्षणिक संस्थांनी लक्ष दिले पाहिजे, असे उद्गार केंद्रीय कृषिमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी कर्मवीरांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. पवार पुढे म्हणाले, इयत्ता आठवीपर्यंत सरसकट उत्तीर्ण करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा काय आहे ते समजत नाही. स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता संपून जाते. परीक्षा काय ते न समजल्याने त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो, असे होऊ नये म्हणून शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले.
‘रयत’चे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब िशदे यांनी, विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यांनी ती पार पाडलीच पाहिजे, असे सांगून परिवर्तन एक दिवसात होत नाही त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाने, परिश्रमाने विद्यार्थ्यांत ते घडवले पाहिजे, असे अ‍ॅड. शिंदे म्हणाले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. अरिवद बुरुंगले यांनी केले. कार्यक्रमास अजित पवार, दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते तसेच संस्थेचे पदाधिकारी, रयत सेवक उपस्थित होते.
यानंतर झालेल्या कौन्सिलच्या बठकीत शरद पवार यांची ‘रयत’च्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी डॉ. गणेश ठाकूर, ऑडिटरपदी शहाजी डोंगरे, सहसचिवपदी प्राचार्य उत्तमराव आवारे तसेच प्राचार्य डी. डी. पाटील यांची निवड करण्यात आली.

Story img Loader