चिक्की खरेदी प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांबद्दल ‘छोटय़ा छोटय़ा विषयांवर मी काय बोलणार’ अशी ‘बोलकी’ प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. मात्र, याविषयी कोणतेही उघड वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ आमदार राज पुरोहित यांच्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलेल्या वक्तव्यांमुळे ‘भारतीय जनता पक्षामधील खदखद बाहेर आली आहे,’ असेही पवार यांनी पत्रकार बैठकीत आवर्जून नमूद केले.
सत्तेवर आल्यानंतर इतक्या कमी कालावधीत त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांबद्दल अशी जाहीर चर्चा सुरू होईल, असे वाटले नव्हते. केंद्र व राज्यातील तीन-चार महिला नेत्यांविषयी माध्यमांमध्ये जे काही चित्र समोर आले आहे, ते काळजी करण्यासारखे असून लोक त्याची नोंद घेतील, याची खात्री आहे. अर्थात, केंद्रात सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. त्याची चिंता नाही. मात्र, राज्यात काय होईल ते सांगता येत नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी प्रथमच जाहीर वक्तव्य करताना भुजबळ यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टिप्पणीही पवार यांनी या वेळी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या चिक्की प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निषेध आंदोलन सुरू केले असतानाच खुद्द पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी मात्र या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
आमदार पुरोहित यांच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलेल्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली. त्यावर बोलताना या कथित स्टिंगमुळे पुरोहित यांच्यासारखा विधिमंडळात पाच टर्म घालवलेला त्यांचा सहकारी विविध प्रश्नांवर मते मांडत आहे. त्यांच्या अन्य सहकाऱ्यांमध्येही हीच भावना आहे, असा टोला पवार यांनी लगावला. सरकारच्या मदतीअभावी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत सापडली, असे सांगतानाच मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आज अस्वस्थ आहे. शेतीउत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलासाठी सरकारने सढळ हस्ते मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने सन्मानित
येथील महात्मा गांधी मिशनच्या वतीने (एमजीएम) पवार यांचा राजकीय, सामाजिक, शिक्षण, उद्योग व क्रीडा क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन गौरव करण्यात आला. एमजीएमचे अध्यक्ष तथा इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सचे कुलपती कमलकिशोर कदम, कुलगुरू डॉ. सुधीरचंद्र कदम, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, विश्वस्त प्रा. प्रताप बोराडे आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आले असता पवार पत्रकारांशी बोलत होते.

Story img Loader