दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेला आलेली मरगळ नगरच्या सराफ बाजाराने झटकून टाकली आहे. सोने व चांदीच्या भावातील घसरणीचा फायदा उठवत मागच्या चार, पाच दिवसात नगरकरांनी सुमारे २० ते २५ कोटी रूपयांचे सोने खरेदी केल्याचा अंदाज व्यक्त होतो. सराफी दालने अजुनही गर्दीने गच्च भरली असून येथील खरेदीचा उत्साह पाहता दुष्काळाचे चिन्हही जाणवत नाही.
सोडेतीन मुहूर्तापैकी पुर्ण मुहूर्त मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षदिनी, गुढीपाडव्याला सोन्याचे भाव ३० हजार रूपये तोळ्याच्या आसपास होते. त्यावेळी कोणाला मंदीची चाहूलही लागली नाही. मुहूर्ताला नियमितपणे सोने खरेदी करणाऱ्या वर्गाने त्या भावातही हा मुहूर्त साधला. मात्र त्याच्या पुढच्या दिवशीच सोने व चांदीच्या भावात घसरण सुरू झाली, ती कालपर्यंत (गुरूवार) सुरूच होती. तूर्त ती थांबली असली तरी हे भाव अजुनही खाली येण्याचीच शक्यता या बाजारपेठेत व्यक्त होते. मात्र आहे त्या परिस्थितीत तीन ते चार हजार रूपयांनी सोने उतरल्याने लोकांची खरेदीला झुंबड उडाली आहे. भावात घसरण सुरू झाल्यानेतर पहिले एक, दोन दिवस सावध भुमिका घेतल्यानंतर आता मात्र ग्राहक आणखी घसरणीची वाट पाहण्याच्या मनस्थितीत नाहीत.
पहिले तीन दिवस या बाजारात भाव घसरले म्हणुन खरेदी सुरू होती, काल गुरूपुष्यामृताचा मुहूर्त लोकांना साधायचा होता. मुहूर्ताच्या सोने खरेदीला समाजात अजुनही कमालीचे महत्व आहे. असंख्य ग्राहक ऐपतीप्रमाणे एक ग्रॅमपासून ते किलोपर्यंत सोन्याची खरेदी महूर्ताला करतात. गुरूपुष्यामृताच्या मुहूर्ताला अशा ग्राहकांनी दुग्धशर्करा योग साधला. हा मुहूर्त आणि २७ हजार ५०० रूपयांच्या आसपास घसरलेला भाव ही त्यांच्या दृष्टीने पर्वणी होती. या एकाच दिवशी शहरात जवळपास दहा कोटी रूपयांपर्यंत सोने (सुमारे ३० ते ४० किलो) विकले गेले असावे असा अंदाज याच बाजारात व्यक्त होतो. काल (गुरूवार) दिवसभर बहुसंख्य सराफी दालनांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेकांना काही वेळ व्यवहारच बंद ठेवावे लागले.
मुळातच सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली तेव्हापासूनच शहरातील सराफ बाजारात सोन्याचे छोटे दागिने व नाण्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. खरेदीला आलेले उधाणच त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यामुळे प्रत्यक्ष सोने देण्याऐवजी ग्राहकांकडून मागणी नोंदवली जात आहे. खरेदीच्या वेळी असलेल्या भावानुसार ही नोंदणी स्वीकारून आठ किंवा पंधरा दिवसांनी वस्तू देण्यात येते. सराफ बाजारातील हा खरेदीचा उत्साह पाहता दुष्काळाचा विसर पडावा अशीच स्थिती आहे. अर्थात या उत्साही ग्राहकांमध्ये प्रामुख्याने शहरी भागातील नोकरदार वर्गाची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात येते. शिवाय ज्यांच्या घरात लग्नकार्ये आहेत, त्यांचाही यात समावेश आहे. असाच वर्ग भावातील घसरणीचा लाभ उठवत आहे.
खरंतर सोन्याच्या जागतिक बाजारपेठेत अजुनही कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळेच सोने व चांदीही आणखी घसरण्याचीच अधिक शक्यता या वर्तुळात तसेच तज्ञांकडून व्यक्त होते. मात्र ग्राहकांना आहे त्या परिस्थिीतही सोने खरेदी करण्याचा मोह आवरता आलेला नाही. त्यामुळेच एकिकडे भीषण दुष्काळ आणि दुसरीकडे सोने खरेदीची झुंबड असा विरोधाभास नगर जिल्ह्य़ात पहायला मिळतो.

Story img Loader