विश्वास पवार
सातारा जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला असतानाच, आशालता वाबगांवकर यांच्या मृत्यूमुळे चित्रीकरणाला देण्यात आलेली परवानगी कायम ठेवावी की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा प्रशासनाने काही नियम आणि अटीनुसार चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. सध्या साताऱ्यातील सातारा, वाई, जावळी, कोरेगाव आणि फलटण तालुक्यात चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरण सुरू असताना करोनाबाधित व्यक्ती, तंत्रज्ञ, कलाकार, सहकलाकार आढळून येत आहेत. त्यातच आई माझी काळुबाई च्या सेटवर जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे करोनामुळे निधन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणाला प्रशासनाने जुलै महिन्यात काही अटी आणि शर्तीवर परवानगी दिली होती. गेल्या एक महिन्यापासून या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. पुढील दोन वर्ष चित्रीकरणासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. हिंगणगाव (ता फलटण) व वाठार स्टेशन (ता कोरेगाव) येथील खासगी शेतघरात( फार्महाऊसवर) हे चित्रीकरण सुरू होते.
चित्रीकरणाला परवानगी देताना प्रशासनाने साठ वर्षांवरील कोणत्याही कलाकाराला चित्रीकरणात सहभागी होता येणार नाही, अन्य आजाराची बाधा असणाऱ्या कलाकारांना चित्रीकरणासाठी सातारा जिल्ह्य़ात येता येणार नाही, चित्रीकरणामध्ये नियमांचे पालन करावे लागेल. वेळोवेळी सर्वाच्या करोना चाचण्या कराव्यात, कलाकारांना राहण्याच्या ठिकाणांचे व ने-आण करणाऱ्या वाहनांचे वेळोवेळी सॅनिटायझर करण्यात यावे. सामाजिक अंतरही पालन करण्यात यावे आदी अटी घातल्या होत्या.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना २७ जणांना करोनाची बाधा झाली. यातील अनेक कलाकार तंत्रज्ञ गाण्याच्या चित्रीकरणासाठी मुंबई येथून आले होते. चित्रीकरण सुरू असलेल्या परिसरात कोणालाही संसर्ग झालेला नव्हता.
परंतु गाण्याच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून आलेल्या सत्तावीस कलाकारांनी करोना चाचणी करणे आवश्यक असताना व त्यांच्यामध्ये काही लक्षणे असल्याचे आढळून येत आहे का नाही याची माहिती न घेता मालिका व्यवस्थापनाने चित्रीकरण सुरूच ठेवले. त्यामुळे यातील सत्तावीस कलाकारांना संसर्ग झाला आणि यामध्ये आशालता वाबगांवकर यांचा मृत्यू झाला.
जेथे चित्रीकरण सुरू होते तेथील संबंधित संचालकांना व चित्रीकरणाच्या व्यवस्थापनाला मागील आठवडय़ात हिंगणगाव ग्रामपंचायतीने लेखी नोटीस बजावली होती. कोणतेही नियम पाळत नसल्याचा आक्षेप यात घेण्यात आला होता. चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती परिसरात मिळू लागल्यानंतर चित्रीकरण पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती. चित्रीकरणाच्या ठिकाणी स्वत:ची सुरक्षा व्यवस्था उभारण्यासंदर्भातही ग्रामपंचायतीने व्यवस्थापनाला कळविले होते. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन झाले नव्हते.
तर चित्रीकरण थांबवा..
साताऱ्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर, जावली परिसरात सध्या अनेक छोटय़ा-मोठय़ा मराठी हिंदी भोजपुरी मालिका, वेब सिरीज, जाहिराती यांचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे चित्रीकरण महिनाभर बंद ठेवावे अशी चर्चा सुरू असताना याला चित्रपट कलाकार, निर्माते, स्थानिक व्यवस्थापक यांनी विरोध दर्शविला आहे. ज्या चित्रीकरणाच्या सेटवर सुरक्षेची काळजी घेतली जात नाही तेथील चित्रीकरण काही दिवस थांबविले पाहिजे, असाही सूर आहे. परंतु इतर सगळीकडे परिस्थिती सारखीच असेल असे नाही. चित्रीकरणामुळे अनेकांना रोजगार मिळतो अर्थार्जनासाठी काम सुरू राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील व्यवस्थापकांनी व्यक्त केले आहे.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासंदर्भात त्यांना दिलेल्या नियमांमध्ये काम झाले आहे की नाही याची माहिती घेतली जाईल. करोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मालिकेच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली होती. शासनाने घातलेल्या अटींचे सर्वाना पालन करावेच लागेल.
– शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा.
हिंगणगाव येथील खासगी फार्म हाऊसचे मालक व चित्रीकरणाचे संबंधित व्यवस्थापकांना मागील आठवडय़ामध्ये नोटीस बजावली होती. चित्रीकरणामुळे मोठी गर्दी होत आहे, ही गर्दी आटोक्यात येत नाही. संयोजकांनी दुर्लक्ष केल्यास करोना संसर्ग वाढू शकतो व कलाकारांनाही संसर्ग होऊ शकतो याबाबत ग्रामपंचायतीने नोटीस बजाविली होती. त्याची कोणतीही दखल न घेतल्याने व करोनाच्या आचारसंहितेचे पालन न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
– जयदीप ढमाळ, माजी उपसरपंच व करोना दक्षता समिती सदस्य, हिंगणगाव, (ता फलटण)
करोना संसर्गातही आम्ही मागील दोन-तीन महिन्यात कलाकारांची, तंत्रज्ञांची काळजी घेऊन चित्रीकरण करत आहोत. या चित्रीकरणामुळे दिवसाला दोनशे ते अडीचशे लोकांना रोजगार मिळत आहे. यामुळे स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, परिसरातील नागरिक छोटे-मोठे लोकेशन यांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. हे शासनाच्या सर्व नियमांचे पालन केल्याने सर्व सुरळीत सुरू आहे.
– सचिन ससाणे, स्थानिक चित्रपट व मालिका व्यवस्थापक, वाई
मागील एक महिना मी आणि आशालता दोघीजणी ‘आई माझी कळूबाइ’च्या चित्रीकरणानिमित्ताने एकत्र राहत आहोत. मस्त हसतखेळत होत्या. कोविडची चाचणी करून आल्यानंतर त्या एकदम चांगल्या होत्या. स्वत:ची काळजी स्वत: घ्यायच्या आणि त्यांचे स्वत:चे असे नियम आखून घेतलेलं जीवन होतं. कधी कुठला आजार नाही की कुठली गोळी नाही. या आशाबाईंना करोनाने घेरणे आमच्या सर्वासाठी फारच धक्कादायक होतं.
– अलका कुबल, अभिनेत्री