अमरावती : येथील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागल्यानंतर कथित ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणात अल्पसंख्याक समुदायातील एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण असून या युवतीला पळवून नेल्याचा आरोप बुधवारी खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केल्याने राजापेठ पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वास्तव समोर आल्यावर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्यात आला, शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली.
या तरुणीने मंगळवारी दुपारी बँकेतून ३ हजार रुपये काढले. नंतर ती रेल्वेने पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या युवतीला सातारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने सातारा येथून ताब्यात घेण्यात आले. ती एकटीच प्रवासात होती. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. प्राथमिक चौकशीदरम्यान तिने आपण रागाच्या भरात घरून निघाल्याचे सातारा पोलिसांना सांगितले आहे, पण ती अमरावतीत आल्यावरच प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणात आंतरधर्मीय विवाहासाठी बळजबरी, तरुणीला कोंडून ठेवण्यात आले, असे आरोप करण्यात आले.
दरम्यान, नवनीत राणांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच खडाजंगीही झाली. हे आरोप करताना हिंदूुत्ववादी संघटनांनी आततायीपणा केल्याचा आक्षेप आता घेतला जात आहे. बुधवारी रात्री ही तरुणी गोवा एक्स्प्रेसने गोव्याकडे जात होती. त्या वेळी सातारा पोलिसांनी रेल्वेस्थानकात जाऊन तिला ताब्यात घेतले. तेव्हा ती तरुणी एकटीच होती. ही तरुणी कुणाकडे जात होती. ती घरून का निघून गेली, तिने आपला मोबाइल बंद का ठेवला, या प्रश्नांची उत्तरे आता तिच्या जबाबातून समोर येणार आहेत. अमरावती पोलिसांनाही तिच्या सविस्तर जबाबाची प्रतीक्षा आहे.
शहरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून तिला सातारा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. सातारापर्यंतच्या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्या भरात ती घरून निघून गेली होती. – डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती