ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांपाठोपाठ नक्षलवाद्यांनी विशेष पोलिस अधिकाऱ्यांना (एसपीओ) तात्काळ काम सोडा अन्यथा, ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांची मदत केली तर याद राखा, या आशयाची पत्रके नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागात वितरित केल्याने खळबळ उडाली आहे. नक्षल्यांनी १८ एसपीओंना लक्ष्य केले असून गेल्या पाच महिन्यात आठ एसपीओंची हत्या केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या पत्रकबाजीमुळे पोलिस सतर्क झाले असून सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
या जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत आहे. अशातच नक्षलवाद्यांनी गेल्या mh02महिन्यात ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांना राजीनामा द्या अन्यथा ठार करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सदस्य व सरपंच दहशतीच्या सावटाखाली आहेत. आता नक्षलवाद्यांनी एसपीओंना तात्काळ काम बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. एसपीओंनी पोलिसांना माहिती दिली तर त्याला ठार करू, अशी धमकी दिली असल्याने एसपीओ भयभीत झाले आहेत. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी अतिदुर्गम गावांमध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी एसपीओ नियुक्त केले आहेत. या एसपीओंना दरमाह ३ हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र, आता नक्षलवाद्यांनी त्यांनाच लक्ष्य करणे सुरू केले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात ८ एसपीओंची, तर गेल्याच महिन्यात नक्षलवाद्यांनी नरेंद्र येर्रावार, शैलेश कारेंगलाब व रवींद्र सुंकरी यांची हत्या केली. रवींद्र सुंकरी हा तर पोलिस पाटलाचा मुलगा होता. त्याचे अपहरण केल्यानंतर हत्या करण्यात आली.
नक्षलवाद्यांनी या परिसरातील एकूण १८ एसपीओंना लक्ष्य केल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात गडचिरोलीत मोठा नरसंहार होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेता आदिवासी भयभीत झाले आहेत. नक्षलवाद्यांनी एसपीओंना धमकी दिल्याची पत्रके ग्रामीण भागात ठिकठिकाणी वितरित केली आहेत. या पत्रकात नक्षलवाद्यांनी पोलिसांना लुटेरे ठरविले असून त्यांना मदत करण्याची काही गरज नसल्याचे म्हटले आहे. जल, जंगल व जमीन हा पूर्णत: आदिवासींचा अधिकार आहे. तेव्हा त्यांची लूट करणाऱ्यांची मदत करू नका, असेही नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. एसपीओ बनून तुम्ही स्वत:च्या आईवडील व समाजाचे वैरी होत आहात. तेव्हा तुम्ही एसपीओ बनू नका, असेही आवाहन नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना केले आहे. अठेरी एरिया कमेटीच्या वतीने ही पत्रके सर्वत्र वितरित केली गेली आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या या पत्रकबाजीमुळे पोलिस सतर्क झाले असून सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Story img Loader