गटबाजीला खतपाणी घालण्याच्या कारणावरून कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेतील अंतर्गत वाद सोमवारी चव्हाटय़ावर आला. संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांना पदावरून हटविण्याच्या घोषणा देत जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या गटाने जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा कार्यकारिणीची बैठक उधळली गेली. याच मुद्दय़ावरून रावते व पवार यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सेनाप्रमुखांच्या निधनानंतर कोल्हापुरात पहिला दौरा करताना रडायचं नाही लढायचं असा संदेश दिला होता. त्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेचे जबाबदार लोकच आपापसातच लढत राहिल्याने शिवसैनिकांत खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. संपर्क नेते दिवाकर रावते हे कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठबळ देतात आणि आपले जाणीवपूर्वक खच्चीकरण करतात, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडून होत होता. याच मुद्यावरून सोमवारच्या बैठकीत वादाला तोंड फुटले. शाहू स्मारक येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीचा आढावा व जिल्हय़ातील पक्षबांधणी यांची चर्चा होणार होती.
बैठकीला सुरुवात झाल्यावर काही वेळातच संजय पवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत रावते यांच्यावर गटबाजी व पक्षपाती धोरण घेत असल्याचा आरोप केला. त्यातून या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. संतापलेले पवार व त्यांचे समर्थक बैठक सोडून सभागृहाबाहेर आले. तेथे त्यांनी रावते यांच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांना पदावरून हटवावे व अरुण दुधवाडकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, असा नारा सुरू ठेवला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार क्षीरसागर यांचे समर्थक बाहेर आले. त्यातून एकमेकांची उणीदुणी काढण्याबरोबर आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. बराच काळ सुरू झालेल्या या वादामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला. बैठकीनंतर रावते म्हणाले, संजय पवार यांनी माझ्याकडे आत्तापर्यंत कसलीही तक्रार केलेली नव्हती. त्यांच्याविषयी चुकीचा शब्द उच्चारला नव्हता. तरीही माझ्याविरुद्ध त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. अनेक वादळे अंगावर घेतली असल्याने हाही प्रसंग निभावून नेण्यास समर्थ आहोत. पत्रकारांशी बोलताना संजय पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मुलांप्रमाणे वागवताना त्यांना लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक मान दिला. संपर्क नेते दिवाकर रावते हे मात्र आपणास नोकरासारखे वागवतात. आमदार क्षीरसागर यांनाच घेऊन ते कामांचे नियोजन करताना मला जाणीवपूर्वक डावलत असतात. त्यांची मुंबईत एक तर कोल्हापुरात दुटप्पी भूमिका असते. सायंकाळी पत्रकार परिषदेत आमदार क्षीरसागर यांनी संजय पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. नेत्यांवर टीका करून आजपर्यंत कोणी मोठे झालेले नाही. पवारांनी आपण खरोखरच शिवसैनिक आहोत का, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला.

Story img Loader