मुंबईत मोर्चे वा तत्सम आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी पूर्वसूचना राज्याच्या गृह विभागाला देण्यात आल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला असला तरी उपरोक्त काळात नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सूचना वगळता ‘रझा अकॅडमीच्या मोर्चातच असे काही घडेल’ अशी काही विशिष्ट पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले. गृह विभागाला पाठविण्यात आलेल्या उपरोक्त पत्राची शहानिशा केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, व्यंगचित्र काढल्याच्या तक्रारीवरून पोलीस कोठडीत असणाऱ्या असीम त्रिवेदीची चौकशी पूर्ण झाली असून त्याच्या सुटकेचे मार्ग मोकळे करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ‘एमएमआरडीए’च्या कामकाजाविषयी श्वेतपत्रिका काढण्याच्या राष्ट्रवादीने केलेल्या मागणीचे त्यांनी समर्थन केले.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत सोहळा सोमवारी गृहमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी अनेक विषयांवर मत प्रदर्शन करतानाच पोलिसांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून टोलेबाजी केली. जाहीर सभा आणि त्यानंतरच्या काळात राज यांच्याकडून झालेल्या वक्तव्याची तपासणी पोली अधिकारी करीत आहेत. त्यात आक्षेपार्ह असे काही आढळल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. रझा अकॅडमीच्या मोर्चात घडलेल्या गोंधळाची पूर्वकल्पना गृह विभागाला आधीच देण्यात आली होती, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले होते. या माध्यमातून राज्याच्या गृह विभागाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जात आहे काय, या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी त्यास नकार दिला. केंद्रीय गृहमंत्री व आपले अतिशय चांगले संबंध असून सद्यस्थितीत वाद घालणे कोणालाही परवडणारे नाही. उलट, त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम केले जात आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाकडून सर्वसाधारण माहिती नियमितपणे दिली जाते. गेल्या महिन्यात तशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. परंतु, ती माहिती या मोर्चातच असे काही घडेल, अशा विशिष्ट स्वरूपात नव्हती. आझाद मैदानावर दररोज पाच ते सहा आंदोलने होतात. पोलीस त्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवतात. त्या दिवशी अंदाज चुकल्याने ही बाब शंका घेण्याच्या पलीकडे गेली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पाठविलेल्या पत्राची शहानिशा केली जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले. मोर्चातील समाजकंटकांचा उद्देश दंगली पसरविण्याचा होता. पोलिसांनी खंबीरपणे प्रयत्न करून तो हाणून पाडला. त्याकरिता आवश्यक तेवढय़ा बळाचा वापर केला. पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. असे असूनही पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केल्या जात असल्याबद्दल आणखी किती जणांना मारायला हवे होते, असा सवाल करत त्यांनी राज यांना फटकारले.व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीविरोधात एका वकिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतचा निर्णय पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत असतो. त्यामुळे त्याचा संबंध लगेच शासनाशी जोडणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पोलिसांची कारवाई योग्य की अयोग्य याचा निर्णय न्यायालय घेईल. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केली आहे. त्यामुळे त्रिवेदीच्या पोलीस कोठडीची आता गरज नसल्याची बाब न्यायालयासमोर मांडली जाईल असेही त्यांनी सांगितले. ‘एमएमआरडीए’च्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सेवेत सवरेत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तेवर आधारीत बढती मिळावी, याकरिता प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली
केंद्रीय गृह विभागाच्या ‘त्या’ पत्राची शहानिशा करणार – आर. आर. पाटील
मुंबईत मोर्चे वा तत्सम आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी पूर्वसूचना राज्याच्या गृह विभागाला देण्यात आल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला असला तरी उपरोक्त काळात नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सूचना वगळता ‘रझा अकॅडमीच्या मोर्चातच असे काही घडेल’ अशी काही विशिष्ट पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
आणखी वाचा
First published on: 11-09-2012 at 09:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R r patil aba mumbai voilance mumbai voilence 2012 mumbai maharashtra sushilkumar shinde central home ministry india