मंत्री राज्याचे, पण विकास बघणार केवळ स्वत:च्या जिल्ह्य़ाचा, असेच चित्र राजकारणात सर्वत्र दिसू लागलेले असताना त्याला छेद देणारी कृती आबांनी नक्षलवादग्रस्त गडचिरोलीचे पालकत्व घेऊन दाखवली. पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री विदर्भाकडे लक्ष देत नाहीत, या भावनेला तडा देणारे आबा म्हणूनच प्रशासन, राजकीय वर्तुळ व प्रामुख्याने पोलीस दलात लोकप्रिय ठरले.
 देशातील अनेक राज्यात आज हा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, यापैकी एकाही राज्याच्या गृहमंत्र्याने या समस्येने ग्रस्त जिल्ह्य़ाचे पालकत्व स्वीकारण्याची धमक दाखवली नाही. ती आबांनी दाखवली. खात्याचा मंत्री म्हणून त्याअंतर्गत येणाऱ्या एखाद्या समस्येवर उपचार म्हणून बोलणे वेगळे आणि ती समस्या मुळापासून कशी सोडवता येईल, यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे वेगळे. आबा हे दुसऱ्या गटात मोडणारे. आजकाल असे आव्हान स्वीकारायला कुणी तयार होत नाही. अनेकदा मंत्री प्रशासकावर जबाबदारी ढकलतात, पण आबांनी मृत्यूची भीती न बाळगता गडचिरोलीला जवळ केले. जेथे अधिकारीच काम करायला तयार होत नाहीत तेथे मंत्रीच तळ ठोकायला तयार झाल्याबरोबर पूर्व विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील प्रशासनाचा नूरच पालटून गेल्याचे चित्र त्यांच्या काळात दिसले. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे आजही गडचिरोलीत केवळ प्रशासनच नाही, तर सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, सारे जीव मुठीत धरून जगतात, वावरतात. त्यांना आबांच्या पालकत्वामुळे धीर आल्याचे चित्र अनेकदा बघायला मिळाले. अनेकदा मंत्री प्रतिमा संवर्धनासाठी अशी जोखीम घेण्याचे नाटक करतात, पण आबा त्यातले नव्हते. नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची धमक अनेक राज्यकर्त्यांना दाखवता आली नाही. कारण, या लढाईला अनेक कंगोरे आहेत. त्याची जाणीव असूनही आबा ठामपणे पोलिसांच्या पाठीशी उभे ठाकले. त्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या पोलिसांची कामगिरीही उंचावली. चार वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी पूर्व विदर्भात राजकीय हत्यासत्र मोठय़ा प्रमाणावर राबवले. यात अनेक पक्षाचे स्थानिक नेते मारले गेले. दुर्गम भागातील या नेत्यांच्या घरी सांत्वनासाठी जाण्याची हिंमत आबा वगळता एकाही मंत्र्याने वा मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराविरोधात आधी लोकयात्रा, मग शांतीयात्रा, नंतर शोधयात्रा निघाली. सामान्यांनी अस्वस्थ होऊन काढलेल्या या यात्रांना आबांनी नुसता पाठिंबाच दिला नाही तर सक्रीय मदतही केली. आबांनी नक्षलवादाचा प्रश्न गांभीर्याने घेतल्याने पोलीस दलाची कामगिरी सुधारली, पण पूर्व विदर्भातील विकासाचे प्रश्न मात्र गती घेऊ शकले नाही. आघाडी सरकार असल्याने इतर सहकारी मदत करीत नाही, अशी खंत ते वारंवार बोलून दाखवत. पुरोगामी विचाराची बैठक पक्की असल्याने साधनाचे संपादक नरेंद्र दाभोलकरांवर त्यांचा भारी जीव. त्यांचाच खून झाला आणि खात्याचे मंत्री म्हणून त्यांचे मारेकरी शोधण्यात अपयश आले, ही बोच त्यांना कायम छळत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भात ताकत अगदीच नगण्य. त्यामुळे आबांनी गडचिरोलीचे पालकत्व घेताच आता पक्षालाही त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांच्या नेत्यांनी बाळगली. आबा ती पूर्ण करू शकले नाहीत. खुद्द गडचिरोलीतच त्यांचा पक्ष आपटला. यातून आलेली अस्वस्थता आबा बोलून दाखवायचे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर आणि सुधीर मुनगंटीवार मंत्री झाल्यानंतर आता सुधीरने गडचिरोलीचे प्रश्न मार्गी लावायलाच हवे, असा निरोप देणाऱ्या आबांची विकासविषयक तळमळ किती मनातून होती, हेच दर्शवते.
देवेंद्र गावंडे, नागपूर

Story img Loader