आघाडीमध्ये काम करताना परस्परांवर चिखलफेक करणे योग्य नाही. राज्य शासन योग्य वेळी योग्य निर्णय घेत असते. आता संपूर्ण मंत्रीमंडळ अहोरात्र काम करत असून लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरूवात झाली आहे असे सांगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. विकास कामे होत नसल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरीकडे सामंजस्याची भूमिका स्वीकारण्याची कसरत सुरू असल्याचे अधोरेखीत झाले.
येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या २६ व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन शुक्रवारी गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी जनहिताच्या निर्णयावरुन काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली तणातणी कमी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री कोणताही निर्णय घेण्यास कमालीचा विलंब लावत असल्याचा आक्षेप उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार घेत आहेत. या संदर्भात पाटील यांनी काँग्रेस आघाडी शासन योग्य वेळी योग्य निर्णय घेत असल्याचे सांगितले.

Story img Loader