काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विकासासाठी कटिबद्ध असून त्यामुळेच राज्याचा व देशाचा विकास झाला आहे. शिवराळ भाषा वापरून व शेतक-यांची माथी भडकावून विकासाचे प्रश्न सुटत नसतात, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फटकारले.
माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आमदार श्यामल बागल, माजी आमदार जयवंत जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते, करमाळय़ाच्या नगराध्यक्षा विद्या चिवटे, सविता राजेभोसले, राजेंद्र बारकुंड, वामनराव बदे, कन्हैयालाल देवी आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास घुमरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
एकीकडे शेतक-यांची दिशाभूल करून आंदोलने करून आपणच शेतक-यांचे कैवारी आहोत असे भासवायचे आणि प्रत्यक्षात शेतक-यांना फसवायचे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धोरण आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे ‘स्वाभिमानी’चा स्वभाव असून तो सर्वानी पुरता ओळखला आहे, अशा शब्दांत आर. आर. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर थेट हल्ला चढविला. स्वाभिमानीचे उमेदवार सदाशिव खोत यांच्या रूपाने आलेले ‘वाळव्याचे पार्सल’ वाळव्याला परत पाठवून द्या. सांगली जिल्हय़ात आपण त्याचा बंदोबस्त करू, असे आवाहन त्यांनी केले. गुजरातमधील नरेंद्र मोदी यांचे विकासाचे मॉडेल फसवे असून प्रत्यक्षात महाराष्ट्र हे गुजरातपेक्षा विकसित राज्य आहे. भाजपने खोटे दावे व दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तासंपादनाचा प्रयत्न चालविला आहे. परंतु तो यशस्वी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवलिंग सुकळे, रश्मी बागल-कोलते आदींची भाषणे झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा