राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत विविध मागण्या केल्या होत्या. त्याबाबत निर्णय झाल्यावरच राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत पक्षनेतृत्वाच्या सल्ल्याने निर्णय घेऊ असे, आझमी यांनी काल जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. यावेळी मौलाना आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देण्यासह विविध मागण्या बद्दल चर्चा झाली असे समजते.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोनच दिवसांत म्हणजे १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर राज्यातून राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी महाविकास आघाडीकडून मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्व आमदारांच्या बैठकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
अबू आझमी बैठकीला होते गैरहजर
दरम्यान, हॉटेल ट्रायडंटमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीला अबू आझमी गैरहजर होते. त्यामुळे यातून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार अर्थात खुद्द अबू आझमी आणि रईस शेख हे कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार? यावर चर्चा सुरू झाली होती. अबू आझमींनी आपल्या मागण्यांसंदर्भातलं एक पत्र देखील मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अबू आझमी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेतून नेमकं काय साध्य होतंय, हे महत्त्वाचं ठरणार आहे.