निळवंडेतून जायकवाडीला पाणी सुरूच
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या सोमवारी (दि. १७) निर्धारीत कोटा पूर्ण झाल्यानंतरच पाणी बंद केले जाईल, त्यामुळे भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन लांबणार आहे.
भंडारदरा धरणाचे आवर्तन लांबू नये म्हणून राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्या (शुक्रवार) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकप्रतिनिधी भेट घेणार आहेत. त्यामुळे शेतीसाठी आवर्तन नेमके कधी सुटणार, याचा फैसला उद्याच (दि. १४) होईल. दरम्यान, प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात दोन फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवरा काठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
भंडारदरा धणातून शेतीसाठी आवर्तन सोडून पावणेचार महिने उलटून गेले आहेत. उसाची उभी पिके भर हिवाळ्यात जळू लागली आहेत. आवर्तन लांबल्यास दोन आवर्तनातील अंतर हे चार महिन्यांचे असणार आहे. धरण बांधल्यानंतर हा एक विक्रमच असेल. ओव्हरफ्लोचे पाणी नाही, पाऊस नाही. धरणात पाणी आहे, पण ते शेतीला मिळत नाही. सरकारच्या हेकेखोरीपुढे लोकप्रतिनिधी व अधिकारी हतबल झाले आहेत. असा सुलतानी प्रकार शेतकरी पहिल्यांदाच अनुभवत आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दि. १० ला शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. पण आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आमदार भाऊसाहेब कांबळे, शंकरराव गडाख यांचा समावेश असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयालाही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे समितीने निर्णय करूनही दि. २० पूर्वी पाणी सुटण्याची शक्यता दुरावली आहे. आवर्तन लांबल्याने आता शेतकऱ्यांना नवीन वर्षांतच पाणी मिळेल.
भंडारदरा व निळवंडे धरणातून तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार होते. त्यापैकी २ हजार ५१८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. निळवंडेच्या दारातून आता केवळ १ हजार ७७५ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. उरलेले ४८२ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीत पोहचण्यासाठी सोमवार (दि. १७) उजाडेल. त्यानंतर प्रवरा नदीपात्रातील बंधाऱ्यात दोन फळ्या टाकून पाणी अडविण्यासाठी दोन दिवस लागतील. म्हणजे दि. २० रोजी आवर्तन सोडणे शक्य होईल.
धरणातून १ हजार ७२५ क्युसेकने पाणी जायकवाडीत सोडले जात आहे. त्यापैकी ओझरला १ हजार ३९२ क्यसेक, तर मधमेश्वरला १ हजार २७ क्युसेकने पाणी मिळते. ४८२ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी फारतर १०० दशलक्ष घनफूट पाणी मिळू शकेल. ८० टक्के पाणी वाया जात आहे. त्यात शेतीसाठी आवर्तन सोडता येत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पाणी बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांनी दिला होता. पण तो अमान्य करण्यात आला. उद्या मुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधी भेटणार आहेत. तो स्वीकारला तरच आवर्तन लवकर सुटू शकेल.
लाभक्षेत्रातील रब्बी पिकांचे आवर्तन लांबणार!
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे सुरूच राहील. येत्या सोमवारी (दि. १७) निर्धारीत कोटा पूर्ण झाल्यानंतरच पाणी बंद केले जाईल, त्यामुळे भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन लांबणार आहे.
First published on: 14-12-2012 at 03:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabi crop delay