दिवाळी, भाऊबीज आटोपताच शेतकरी पुन्हा कामाला लागला असून नागपूर विभागात रब्बी पिकांच्या  पेरणीला वेग आला आहे. विभागात जवळपास २५ टक्के म्हणजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा व ज्वारी पिकांची पेरणी झाली आहे. सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे हरभरा पिकाकडेच शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हरभरा पिकाची ४५ टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्य़ात भात पिकावर खोड किडीची प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
नागपूर विभागाचे रब्बी पिकांचे क्षेत्र ४ लाख, ५ हजार २०० हेक्टर असून आतापर्यंत जवळपास २५ टक्के क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली. सिंचनाच्या पेरशा सोयी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी अधिक केली आहे. हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख, २१ हजार १०० हेक्टर एवढे असून ५५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी गहू पिकाची पेरणी करीत आहेत. विभागात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख, १६ हजार, ८०० हेक्टर असून केवळ ७ टक्के म्हणजे ७ हजार, ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. अशीच स्थिती ज्वारी पिकाची आहे. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार, ४०० हेक्टर असून ६ टक्के क्षेत्रावर म्हणजे १९०० हेक्टरवर ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे.
विभागात वर्धा जिल्ह्य़ात रब्बी पिकांची पेरणी ३३ टक्के, नागपूर जि ल्हा ३५ टक्के, भंडारा जिल्हा २९ टक्के, गोंदिया जिल्हा ४१ टक्के, चंद्रपूर जिल्हा ५ टक्के व गडचिरोली जिल्ह्य़ात केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धान पट्टय़ात रब्बी पिकांच्या पेरणीला अद्याप वेग आलेला नाही.
विभागात रब्बी मका, लाखोळी, तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी अद्याप केलेली नाही. नागपूर व भंडारा जिल्ह्य़ातील काही शेतकऱ्यांनी जवस पिकाची पेरणी केली आहे.  विभागात सोयाबीनच्या मळणीचे काम सुरू आहे.
तूर पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. लवकर रोवणी झालेल्या हलक्या जातीच्या धानाची कापणी सुरू आहे. उशिरा रोवणी झालेले पीक पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. विभागात कापसाची दुसरी वेचणी सुरू आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील कामठी व मौदा तालुक्यातील काही गावांमध्ये धान पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या किडीने शेतक ऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले आहे.

Story img Loader