अरुंधती देवस्थळे

सॅल्वादोर दाली (१९०४-१९८९) हे कलाजगतातलं एक वैचित्र्यपूर्ण व्यक्तिमत्त्व. कमालीचं गुंतागुंतीचं, आंतर्विरोधाने भरलेलं! त्यांना अभिप्रेत सौंदर्यदृष्टीचा आणि सर्जनशीलतेचा पुरता ठाव लागलेलं फारसं कोणी दिसत नाही. मुळात ‘कला सुंदर असली पाहिजे’ ही अपेक्षा त्यांना अवास्तव वाटे. कला हे संवेदनेचं प्रकटीकरण असेल तर ते केवळ उदात्त, सुंदर कसं असेल, त्यात काही नकारार्थी, त्रासदायक असणारच असा त्यांचा दृष्टिकोन. रेने माग्रीते, पिकासो, कवी लोर्कासारखे मोजके मित्र असूनही आपण काटेरी व्यक्ती आहोत अशी प्रतिमा बनवण्यासाठी दालींनी मुद्दाम स्वत:बद्दल अपसमज निर्माण केले- ते होतेच विक्षिप्त- हे कळत नाही. त्यांच्या चित्रांइतकीच त्यांच्या विक्षिप्तपणाची आणि खऱ्या-खोटय़ा कहाण्यांची चर्चा झालेली दिसते आणि तरी जगातल्या सर्व नामी संग्रहालयात ते असतातच! सुरुवात अर्थात त्यांच्या आकडेबाज मिशा आणि कायम विस्फारलेल्या चमकदार डोळय़ांपासून! सगळंच त्यांच्या र्सीअलिस्टीक शैलीशी मेळ खाणारं आणि नाटकीय. लोकांना आपल्या कलेतून आणि बोलण्यातून आश्चर्याचे झटके देणं हा त्यांचा ‘यूएसपी’! सर्जनात चित्रकला, शिल्पकला आणि ‘प्रॉडक्ट अँड सेट डिझाईिनग’ हे होतंच. त्यांनी फोटोग्राफी आणि फिल्म बनवण्याचेही प्रयत्न केले होते.

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
avneet kaur met tom cruise mission impossible 8 set
२३ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट, पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले…
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

स्पेनमध्ये कॅटालूनियात जन्मलेल्या दालींच्या अस्वस्थ मनोवृत्तीला लहानपणीच्या दु:खद आठवणीही कारणीभूत होत्या. ते त्यांच्या मरण पावलेल्या भावाचा पुनर्जन्म आहेत असं कुटुंबात मानलं गेल्याने, आईवडील आपले नव्हे तर आपल्यामार्फत मृत भावाचे लाड करतात असं त्यांना वाटे. ते कुमारवयात असताना त्यांची आई वारल्यानंतर वडिलांनी मावशीशी लग्न केलं, त्याचा त्यांना प्रचंड राग. मोठेपणी दालींच्या अपमानास्पद वर्तणुकीने संतापून वडिलांनी कुटुंबातून त्यांना वजा करून टाकलं. वडिलांच्या नजरेत ते नेहमी एक विकृत व्यक्ती राहिले.

स्वत:ला अहंमन्य घोषित केलेल्या दालींनी अतिशय व्यक्तिगत, फ्रॉयडिअन इमेजरीत शोभणारी चित्रं काढली होती. त्यांनी चित्रकलेत एक नवीन भाषा आणली- तर्क आणि व्याकरणमुक्त It is perhaps with Dalí that for the first time the windows of the mind are opened fully wide असं र्सीअलिझमचे प्रणेते आंद्रे ब्रेताँनी म्हटलं होतं. पण नंतर दालींच्या बीभत्सतेमुळे वैतागून त्यांना र्सीअलिस्ट चळवळीमधून काढूनही टाकलं होतं. दालींना असलेला लैंगिक भयगंड आणि मर्त्यतेची भीती यांनी त्यांच्या शैलीला एक क्यूबिस्ट, र्सीअलिस्टीक मिश्रणाचं परिमाण दिलं. चित्रकलेबद्दलच्या त्यांच्या या पवित्र्यामुळे नंतरच्या पिढय़ांना वातावरण खुले होण्यात खूप मदत झाली. ‘‘People are no longer limited to talking about their phobias, manias, feelings and desires, but can now touch them, manipulate and operate them with their own hands.’’ असं दाली म्हणत.
माद्रिद आर्ट अॅकेडमीत ‘आपले पेंटिंगचे सर बाराच्या भावात काढण्याजोगे आहेत, मी शिकावं असं त्यांच्याकडे काही नाही,’ असं जाहीर करणाऱ्या दालींचं निखळ आत्मप्रेम आयुष्यात फार लवकर उघड झालं होतं. परिणाम व्हायचा तोच झाला, त्यांना कॉलेजमधून काढून टाकलं गेलं. साचेबद्ध शिक्षणातून स्वत:ला मोकळं करायचं होतं म्हणून ते १९२९ मध्ये पॅरीसमध्ये निघून आले. इथे त्यांची क्युबिझम आणि आवां गार्द मूव्हमेंटशी ओळख झाली. त्याच वर्षी आधी त्यांनी Un Chien Andalou(एक अंडालुसियन कुत्रा) ही स्पॅनिश फिल्मही केली होती- सहनिर्मितीत अॅब्सर्ड दृश्यांचं कोलाज केल्यासारखी, पण ती त्यांना स्वत:लाच पसंत पडली नाही. त्यावर प्रेक्षकांनीही नापसंती दर्शवल्याने दालींनी त्या माध्यमाचा नाद सोडला. त्यांचा कल ओल्ड मास्टरच्या शैलींमधून आधुनिक युगाच्या असुरक्षितता आणि भयाकडे बघण्याकडे असे. त्यात स्वत:च्या मनातले गंड आणि अकारण ग्रासणारी भीती असे. कायम प्रकाशझोतात राहणं, वादविवाद निर्माण करणं त्यांना आवडे.

इथे दिलेलं १९३१ मधलं त्यांचं ‘दी पर्सिस्टंन्स ऑफ मेमरी’ (२४ से.मी. x ३३ से. मी. ऑईल ऑन कॅनव्हास) हे चित्रं समीक्षकांनी उचलून धरल्यामुळे वेगवेगळय़ा गॅलरींमध्ये दाखवण्यात आलं. दालींची प्रसिद्धीकडे घोडदौड सुरू झाली. निसर्गात उघडय़ावर वितळून लोंबत पडलेलं घडय़ाळ, निष्पर्ण वृक्ष, त्यावर टांगलेले मानचिन्ह, मागे स्पॅनिश पिवळे करडे पर्वत (माऊंट पनी) आणि निळा समुद्र, जमिनीवर एक प्राण्यासारखी आकृती पहुडल्यासारखी, तिला लांब लांब पापण्या आणि त्यावरही असंच लोंबलेलं घडय़ाळ, एक चौकोनी स्लॅब.. या चित्रांत अनेक विसंगत गोष्टी एकत्र आल्या आहेत- अस्वस्थ मनाच्या जाणिवा- नेणिवांत असतात तशा व्यामिश्र. घडय़ाळाचं मोटिफ पुन्हा पुन्हा येणारं म्हणजे, वेळ-काळाचं सुटता न सुटणारं भान. त्या काळी दाली म्हणत, ‘‘The only difference between immortal Greece and the present time is Sigmund Freud, who discovered that the human body… is today full of secret drawers that only psychoanalysis is capable to open’’ कला- इतिहासकार कॅरोलाइन मर्फी यांनी आईकडून कलेचा वारसा लाभलेल्या दालींची कला आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाच्या परस्परसंबंधावर शोधकार्य करून या व्यामिश्रतेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तो शोधनिबंध दालींबद्दल बरंच काही अधिकृतरीत्या सांगणारा..

दालींची धाकटी बहीण अॅना मारिया त्यांची सुरुवातीची अनेक वर्ष मॉडेल असे. तिचं त्यांनी काढलेलं ‘फिग्युरा दे परफील’ (७४.२ x ५० सें. मी. ऑईल ऑन बोर्ड) हे खिडकीतून बाहेर बघणारं चित्रं खूप प्रसिद्ध झालं. तिच्या संग्रही राहिलेलं हे एकमेव चित्रं, त्याची किंमत आज सात आकडी आहे. पुढे दालींनी ‘दी सिक्रेट लाईफ ऑफ सॅल्वादोर दाली’(१९४२) हे कुटुंबाबद्दल अतिशय विवादास्पद पुस्तक लिहिल्याने तिने त्यांच्याशी संबंध तोडले आणि आपल्या कुटुंबाची बाजू सांगणारं ‘सॅल्वादोर दाली अॅज सीन बाय हिज सिस्टर’(१९५०) हे पुस्तक लिहीलं. त्याने दाली इतके खवळले की त्यांनी तिला मारण्याची धमकी दिली. भाऊ- बहिणींत संवाद गोठला तो आयुष्यभर! त्यात दाली स्वत:हून १० वर्ष मोठय़ा, विवाहीत रशियन स्त्रीच्या प्रेमात पडलेले. तिला ते गाला म्हणत. ती त्यांच्या दुखावलेल्या मनावरचे घाव भरून काढून नवजीवन देणार आहे असा त्यांचा अढळ विश्वास होता. नंतरची काही वर्ष त्यांच्या चित्रांवर ते स्वत:बरोबर तिचंही नाव जोडत. अनेकदा ते स्वत:च्या मनात पात्रं निर्माण करून त्यांच्याशी बोलत बसत. पैशावर अफाट प्रेम, तरी आपण एका स्पॅनिश संताचा अवतार आहोत असा दावा!

१९३०च्या सुमाराला त्यांनी तो आता सुप्रसिद्ध झालेला चार वेगवेगळय़ा रंगातला ‘लॉब्स्टर टेलीफोन’(१५ x ३० x १७ से. मी. प्लास्टर) आणि त्याच्यासारख्या काही कलाकृती बनवायला सुरुवात केली. या वस्तूंना दोन पैलू असत. चित्रकलेतलं याचं एक चर्चित उदाहरण म्हणजे ‘अॅपरिशन ऑफ फेस अँड फ्रूट डिश ऑन अ बीच’ हे तैलचित्रं (१.१५ x१.४४ , १९३८) यातला फळांनी भरलेला वाडगा पाहिला तर एका स्त्रीच्या चेहऱ्यासारखा किंवा नक्षीदार पात्रासारखा. मागचे बर्फाच्छादित पर्वत सफेद भुऱ्या कुत्र्यासारखे!

Premonition of Civil War हे दालीचं चित्रं देश- स्पॅनिश सिव्हिल वॉरच्या उंबरठय़ावर असतानाचं (ऑइल ऑन कॅनव्हास १९३६). ‘नरेचि केला हीन किती नर’चं चित्र असेल तर ते हे किंवा पिकासोचं ‘गर्निका’. अमानुष विध्वंस- चित्रकाराच्या आणि जनमानसाच्या मनातला. याची रंगयोजना, हिंसक आणि ध्वस्त आकारांची सरमिसळ फक्त भकासपणा वाढवणारी.

कॅटलान संस्कृतीमध्ये वाढलेल्या दालींच्या मनात ती संस्कृती, तिच्यातलं खाण्यापिण्याचं प्रेम आणि रोमन कॅथॉलिसिझम कायम असायचा, जो त्यांच्या कलेत सुसंगत/ विसंगत रूपात प्रकट व्हायचा. स्पॅनिश चित्रकलेचा विशेषत: स्पॅनिश सुवर्णयुगात, बरोक शैलीत चित्रं काढणाऱ्या, दिएगो वेलाक्वेझ या चित्रकाराचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता. त्याच्यावर उपलब्ध असलेलं सर्व साहित्य त्यांनी आपल्या खाजगी ग्रंथसंग्रहालयात आणून ठेवलं होतं. १९४०च्या सुमाराला दाली अमेरिकेत गेले आणि तिथे मात्र त्यांना खूप प्रशंसा मिळाली, इतकी की त्यांचं एक म्युझिअम फ्लोरिडातही आहे. या आठ वर्षांच्या काळात त्यांनी खूप चित्रं काढली, काही शिल्पं बनवली. बाजारपेठेतल्या दुकानांच्या खिडक्या सजवणं, बॅलेसाठी सेट्स डिझाईन करण्याव्यतिरिक्त हिचकॉक आणि वॉल्ट डिस्नीच्या फिल्म्सवर काम केलं. कमर्शिअल आर्टने त्यांन भरपूर पैसा मिळवून दिला. जाहिराती, पुस्तकांची मुखपृष्ठे, छायाचित्रांतून इतर माध्यमांशी जोडत केलेली पॉप आर्ट. अर्थात याला अभिजाताचा दर्जा आणि मान मिळणार नव्हता, पण एक ‘दाली ब्रँड’ तयार झाला, जो बाजारात चलनी होता. ‘दाली ब्रँड’ म्हणजे काय तर विचित्र आकृती, चित्रातील वस्तूंचा एकमेकांशी ताळमेळ नसणं, स्वप्नांत दिसाव्यात तशा विसंगत गोष्टी, असलंच काही सुंदर तर त्याच्याशी जोडलेलं वैगुण्य.. असं एक आगळंच सौंदर्यशास्त्र. दाली कुठल्या स्कुलमध्ये बसणारे नव्हतेच. ते स्वत:बद्दल एकदा म्हणाले होते, ‘‘एखादा वेडा माणूस आणि मी यात फक्त इतकाच फरक आहे की मी वेडा नाही.’’

१९८४ मध्ये गालाच्या मृत्यूनंतर दाली सैरभैर झाले. त्यांनी त्यांच्या घराला आग लावून सर्व संपवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यातून वाचले. झालं गेलं विसरून भावाच्या भेटीला आलेल्या अॅना मारियाला मात्र त्यांनी क्रोधातिरेकाने खोली बाहेर हाकलून दिलं.. त्याच्या जन्मगावी, फिगॅरसमध्ये दाली थिएटर म्युझिअम आहे. हे म्युझिअम म्हणजे नगरपालिकेच्या थिएटरच्या जागी दालींनी बारकाव्यांसहित डिझाईन केलेले स्वत:चे स्मृतिस्थळ. ‘‘It’ s obvious that other worlds exist, that’ s certain; but, as I’ ve already said in many other occasions, these other worlds are inside ours, they reside on earth and are precisely at the centre of the dome of the Dalí Museum, which contains the new, unsuspected and hallucinatory world of Surrealism.’’ ही त्यांची त्यामागची भूमिका. इमारती आणि अंगणाला दिलेली वळणं आणि संगमरवरी गोलसर गोटय़ांचे अंगण पाहून गौडीची आठवण येते. ‘‘कला आणि कलाकार शेवटपर्यंत वेगळे होऊ शकत नाहीत म्हणून मला माझ्या कलेच्या म्युझिअममध्येच दफन करावे,’’ असं लिहून ठेवून गेलेले दाली असे एकमेव कलाकार असावेत ज्यांची कबर त्यांच्या म्युझिअममध्येच आहे.

undhati.deosthale@gmail.com