राहाता : वसंतदादा शुगर इस्टिट्यूटने आता खासगी संस्थांनाही सभासदत्व देण्यास प्रारंभ केल्याने ही संस्था आता राजकीय अड्डा बनत चालली आहे. या संस्थेने सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाचे धोरण घ्यायला पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकार चळवळीपुढे अनेक प्रश्न आहेत; पण ते सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.

‘जाणते राजे’सुद्धा दिल्लीत फक्त शिष्टमंडळ घेऊन जातात, अशी टीका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. सहकारी संस्थांचे प्रश्न न सुटल्यामुळेच अनेक संस्था बंद पडल्या. कारखान्यांचे खासगीकरण झाले. कवडीमोल भावाने कारखाने विकले गेले. केवळ सहकारातील संस्थांना दडपून टाकत दहशत निर्माण केली. राजकीय सोयीसाठी संस्थाचा वापर झाल्याची टीकाही त्यांनी केली.

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा अमृत महोत्सवी गळीत हंगाम सांगता समारंभ आज, बुधवारी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी मंत्री विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदी उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे आधुनिकीकरण, गाळप क्षमता वाढवण्याचा प्रयत्न असून, सभासदांना भाव देण्यातही कारखाना प्रथम क्रमांकावर राहील, अशी ग्वाही देत विखे म्हणाले, की एकीकडे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होताना कारखान्याची ७५ वर्षांची वाटचाल पूर्ण होणे ही सहकार चळवळीसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

शेतकरी, सभासदांच्या हिताच्या निर्णयांमुळेच ७५ वर्षे हा कारखाना अविरत सुरू राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार चळवळीला मोठी बळकटी मिळाली. अहिल्यानगर जिल्हा बँकेने चांगले काम केल्याने जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने तग धरू शकले. योग्य नियोजनामुळे पाण्याची समस्या भेडसावणार नाही. आवर्तन योग्य पद्धतीने झाल्यामुळेच बंधारे आज भरलेले आहेत. येत्या ७ तारखेपासून भंडारदरा धरणातून आवर्तन सुरू होईल. आणखी दोन आवर्तनांचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.