शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा दावा करत होते. परंतु, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून ते आणि त्यांचे आमदार थेट सत्तेत सामील झाले. त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधीदेखील पार पडला. या बंडानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले. दरम्यान, आता कॅबिनेटमध्ये ९ नवे मंत्री सहभागी झाल्याने मंत्रिमंडळात खांदेपालट होईल असं बोललं जात आहे. अनेक जबाबदाऱ्या विभागून दिल्या जातील, असंही सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅबिनेटची आजची बैठक पार पडल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी विखे पाटील म्हणाले आजच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असल्यामुळे विकासाला गती आली आहे. याआधीदेखील अशी गती होती. परंतु आता ट्रिपल इंजिनमुळे गती वाढली आहे. लोकाभिमूक कामं करण्यात आणखी उत्साह आला आहे. नव्या ट्रिपल इंजिन सरकारचं राज्यात स्वागत होत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आपल्या राज्याला गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगली कामं करत आहेत. आता अजित पवारही आले आहेत. आता आणखी चांगली कामं होतील, ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “शपथविधीला शरद पवारांची संमती…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “तो निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना…”

यावेळी विखे पाटील यांना विचारण्यात आलं की, मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे का? मंत्र्यांकडील खाती बदलली जातील का? त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले यासंबंधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतील. तसेच विखे पाटलांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांना महसूल खातं दिलं जाईल, असं बोललं जात आहे, असा निर्णय झाला तर तुम्हाला तो मान्य असेल का? या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असेल. शेवटी संघटनेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो राज्यहिताचा असतो. आम्ही तो अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil answer on what if ajit pawar is given revenue ministry asc