कराड : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ असे नाव देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून भाजपचे पाटण विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख विक्रम पाटणकर व भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी शासनाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुंबईत मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘छत्रपती शिवाजी महाराज जलाशय’ असे नामकरण करण्यात यावे, या प्रस्तावास मंजुरी देऊन तसा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे यांचीही या बैठकीला उपस्थिती होती.बैठकीत जलाशय परिसराचे सुशोभीकरण, पर्यटन विकास, तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. कोयना परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त व्हावे आणि स्थानिक प्रदेशाचा विकास व्हावा, यासाठी या उपक्रमाला गती देण्यात येणार आहे. मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘कोयना प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा असून, या जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केल्यास जनतेच्या भावना अधिक दृढ होतील, असे सांगत त्यांनी संबंधित विभागांना याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कोयनानगर परिसरातील मूलभूत सुविधा, तसेच प्रदूषण नियंत्रण आणि जलस्रोत संवर्धन यासंबंधी सूचनांची नोंद घेण्यात आली. जयकुमार गोरे यांनी स्थानिकांच्या मागण्या मांडल्या. परिसरात पर्यटन विकासासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्याची गरज शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली. येत्या काळात संपूर्ण अंमलबजावणी आराखडा, समन्वय समितीची निर्मिती आणि स्थल निरीक्षणाची योजना या वेळी ठरवण्यात आली.

मागणीकर्ते विक्रम पाटणकर म्हणाले, की कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. या धरणातील जलसाठ्याला शिवसागर जलाशय असे संबोधले जाते. हे अपूर्ण असलेले नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज जलाशय’ असे करण्याची आमची मागणी होती. ती पूर्णत्वास जात असल्याचा आनंद पाटण तालुक्यातील जनतेला व भाजप कार्यकर्त्यांना आहे. कोयना धरण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीसह माहिती फलक, उद्यान, पर्यटक केंद्र व देखभाल व्यवस्थेसाठी स्वतंत्र निधीची मागणीही या बैठकीत करण्यात आली आहे. यामुळे कोयनानगर परिसराच्या विकासास चालना मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी जोडलेली अभिमानास्पद ओळख निर्माण होईल.