Radhakrishna Vikhe Patil : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू आणि खडी क्रशरबाबत धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ‘वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत’, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तसेच त्यांच्या या विधानानंतर मोठी चर्चा रंगली. विरोधकांनीही टीकेची झोड उठवली. यानंतर अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकारण दिलं आहे. “सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो”, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“तुम्ही सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या घोरणांबाबत आम्ही अतिशय कडक राहिलो आहोत. धोरणाची अंमलबजावणी करताना कुठेही कसूर केलेला नाही. प्रसंगी आम्ही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली. नदीतून वाळू काढण्याला माझा कायमच विरोध राहिलेला आहे”, असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते?

“आधीच्या काळात शनिवारी एक चित्रपट लागायचा. तेव्हा चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. मी १९७५ ला मॅट्रीक पास झालो. तेव्हा चित्रपट पाहण्याचा वेगळा आनंद असायचा. आता चित्रपट पाहण्यासाठी कोणी मांडी घालून बसणार का? आता तंत्रज्ञान बदललं आहे. खरं तर आपण एखाद्या दिवशी आनंदाच्या विश्वात गेलं पाहिजे. अन्यथा दररोज तेच-तेच हा गेला, तो आला. अन्यथा वाळूच्या ट्रक पकडल्या असं ऐकावं लागतं. आपली जिल्हा परिषद आहे त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूच्या ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. सोलापूर यासाठी फार प्रसिद्ध आहे. मी मागे एकदा त्यांना (जिल्हाधिकाऱ्यांना) म्हटलं होतं की, दुर्लक्ष करा थोडसं. गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत”, असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं.

टीकेनंतर विखे पाटलांची सारवासारव

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर वाद होण्याची शक्यता पाहता राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानासंदर्भात स्पष्टीकारण देत सारवासारव केली. तसेच आपला नदीतून वाळू काढण्याला कायमच विरोध राहिलेला असल्याचंही यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader