पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यात मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यांचं लोकार्पण केलं. यानंतर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी शिर्डीतील काकडी येथे नमो शेतकरी महासन्मान मेळाव्याचं आयोजन केलं. तेथे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटा घालून आणि भेटवस्तू देत पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. यानंतर बोलताना विखेंनी मोदींसमोर महाराष्ट्रातील दुष्काळाचा उल्लेख करत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “विश्वनेता, लोकप्रिय पंतप्रधान आमच्या भागात आले आहेत. यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यापेक्षा अधिक अभिमानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. यामुळे मला फार आनंद झाला आहे. तो आनंद मी व्यक्त करू शकत नाही.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य”

“महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती आहे. मी देवेंद्र फडणवीसांना याबाबत सांगितलं आहे. माझ्या वडिलांनी आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना केली होती. यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा, नाशिक, मराठवाडा या भागाला पाणी देण्याविषयी त्यांनी मांडणी केली होती. त्याविषयी फडणवीस बोलतील,” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केलं.

“…म्हणून आम्ही मोदींबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”

दरम्यान, या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. हा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, कारण…”; गुणरत्न सदावर्तेंची आक्रमक मागणी, म्हणाले…

“५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम”

“माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं. निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं. बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या. हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil comment on draught in maharashtra in front of pm narendra modi pbs
Show comments