काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींकडे विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आज जोरदार रंगली. त्यानंतर थोरात यांचे प्रतिस्पर्धी आणि जिल्ह्यातील भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. “२०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणारे आता हतबल का झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थोरातांच्या भूमिकेवर केली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर माध्यम प्रतिनिधींनीकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुंबई मंत्रालय येथे हे वक्तव्य केले.
नाशिकमध्ये मविआचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने काय केलं?
नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात, त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. यात बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे,असे विखे पाटील म्हणाले.
निवडणुकीचा प्रचार व्हीसीवर का नाही केलात?
विखे पाटील म्हणाले की, ज्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआचा प्रचार करायचा होता, त्यावेळी तुम्ही आजारी होता. निवडणूक संपल्यानंतर तुम्ही व्हीसीवर भूमिका स्पष्ट करायला लागलात. मग निवडणुकीत देखील व्हीसीवर प्रचार करु शकला असता. सोयीप्रमाणे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांनी खरी परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे विनाकारण लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणे योग्य नाही, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा. परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे, त्याची जबाबदारी ते घेणार की नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.