विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. मात्र या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याने सुनावणीसाठी वेळ लागणार असल्याचे कारण देत ही नियुक्ती हंगामी असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. हे पद काँग्रेसने पटकावले असले तरी त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ठेवण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अशाप्रकारे झाली आहे.
गेले काही दिवस विरोधी पक्षनेते-पदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तिढा निर्माण झाला होता. विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने धनंजय मुंडे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. विधानसभेत काँग्रेसचे ४२ सदस्य आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ सदस्य आहेत. शेकापच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांनीही विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला आहे. सत्ताधाऱ्यांनी दोन्ही काँग्रेसमधील भांडणाचा पुरेपूर फायदा उचलला व काँग्रेसला झुलवतही ठेवले.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत अध्यक्ष बागडे यांनी मंगळवारी सुनावणीसाठी बराच वेळ लागणार असल्याचे कारण देत हंगामी नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. उच्च परंपरा व नीतीमूल्यांसाठी आणि सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विरोधी पक्षनेता आवश्यक असतो. महाधिवक्ता व अन्य कायदेतज्ज्ञांची मते अजमावल्यानंतर काँग्रेसचे विखे-पाटील यांची या पदी नियुक्ती केल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. या पदावरील दाव्यांची सुनावणी योग्यवेळी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळ अधिवेशनाचा बुधवारी अखेरचा दिवस असताना विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर झाली. आता सुनावणीत निर्णय कोणाच्या बाजूने होईल, याची टांगती तलवार विखेपाटील यांच्यावर पुढील काळात राहणार आहे.

Story img Loader