ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. मात्र, नगरमधील मोठं राजकीय नाव असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. तसेच, त्यांच्या या दौऱ्यांना कुणी फारसं गांभीर्यानं घेणार नाही, असंही विखे पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये नव्याने राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंनी आज नगर जिल्ह्यातील काही दु्ष्काळग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. “या पावसात पीक येऊ शकत नाही. कितीही पाऊस होऊ द्या. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. याच गावात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमावर एवढा खर्च झाला. पण आमचे साडेसात कोटी रुपये द्यायला या सरकारला मिळालं नाही”, अशा शब्दांत इथल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला.
चिमुकल्यानं हातात लोणचं-भाकरी ठेवताच उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत…
“…तेव्हा उद्धव ठाकरेंना शेतकरी दिसला नाही का?”
दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांना भेटत असताना दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना या दौऱ्यावर टीका केली. “उद्धव ठाकरेंचा बांधावर जाण्याचा हा फार्स आहे. त्यांना ही गोष्ट मनोरंजन वाटते. यापूर्वी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘५० हजार रुपये एकरी मदत केली पाहिजे, त्यासाठी मी स्वस्थ बसणार नाही’ असं ते म्हणाले होते. त्याचं काय झालं? २०१४ ते १९ त्यांचं सरकार होतं. तेव्हा काय केलं तुम्ही? तेव्हा तुम्हाला शेतकरी दिसला नाही का?” असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
“लोक त्यांचे दौरे गांभीर्यानं घेणार नाहीत”
“पाच वर्षं तुम्ही सत्तेत राहिलात आणि ५० हजार देण्याच्या वल्गना तुम्ही केल्या. म्हणे ‘विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही’. तुम्ही विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर मोर्चे काढले होते. अडीच वर्षं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता. विमा कंपन्यांवर काय कारवाई केली तुम्ही? त्यामुळे या त्यांच्या राजकीय कृती आहेत. लोक त्यांचे दौरे गांभीर्याने घेतील असं मला वाटत नाही”, असंही विखे पाटील यांनी यावेळी नमूद केलं.