रामदास धुमाळ यांचा पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय प्रभाव कमी करण्याकरिता खेळी केल्याची गंभीर दखल घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राहुरीच्या तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आता त्यांच्या मंडळाला ज्येष्ठ नेते रामदास धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळाने जाहिर पाठिंबा दिला आहे.
तनपुरे कारखाना निवडणुकीसंदर्भात विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष पाटील, डॉ. सुजय विखे, रावसाहेब तनपूरे, सुरेश करपे, आसाराम ढुस, शरद पेरणे आदी उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना विखे म्हणाले, तनपुरे कारखाना चालविण्यास घेण्याचा प्रस्ताव आम्ही दिला. विखे कारखान्याचे तिसरे युनिट म्हणून ते सुरु करणार होतो. डॉ. विठ्ठलराव विखे यांनी सहकाराचे रोपटे लावले. त्यामुळे आपण खासगी कारखाना काढणार नाही. सहकारच जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करु. संस्था मोडित काढणे हा आपला धंदा नाही त्यामुळे मुळा प्रवरेसारख्या संस्थेसाठी पदरमोड केली. गणेशचे खासगीकरण होवू न देता तो यशस्वीरित्या चालविला. शेतकऱ्याची बांधिलकी ठेवली असे ते म्हणाले.
कारखाना बंद पाडणारे आता इकडून तिकडून पैसे आणून असे सांगून तो चालविण्याची वल्गना करत आहे. त्यांनी भाडे तत्वावर कारखाना चालविण्यासाठी निविदा का भरल्या नाही असा सवाल विखे यांनी केला. डॉ. विखे यांनी निवडणुकीत माजी संचालक व त्यांच्या घरातील मंडळींना उमेदवारी देणार नाही. प्रगतीशील शेतकरी, तज्ञ व युवकांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. सुभाष पाटील यांचेही भाषण झाले. आभार सोपान म्हसे यांनी मानले. मेळाव्याला उदयसिंह पाटील, सुरेश येवले, विजय डवले, सुरेश बानकर, शरद पेरणे, भिमराज हारदे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कारखाना निवडणुकीत विखे यांच्या मंडळाला विकास मंडळाचे नेते रामदास धुमाळ यांनी पािठबा दिला आहे. विकास मंडळाला विखेंच्या एवढी कुणीही मदत केलेली नाही. मला मुळा प्रवरा, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष केले. माझा मुलगा सुधीर याला पंचायत समितीचे सभापती केले. एका कुटुंबाची सत्ता संपविली. राहुरीच्या विकासाकरिता नेहमी मदत केली. त्यामुळे विकास मंडळ विखे यांच्याच बरोबर राहणार असल्याचे धुमाळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा