Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : राज्यात महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या ५५ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. तर महायुतीने जवळपास २३२ जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर संशय घ्यायला सुरुवात केली. एवढ्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकण्यामागे ईव्हीएमचा घोळ कारणीभूत असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सातत्याने बोलत आहेत. दरम्यान, यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याच मुद्द्यांवर शरद पवारांवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीच्या पराभावामागे ईव्हीएमवर खापर फोडलं जातंय, असा प्रश्न पत्रकारांनी आज राधाकृष्ण विखे पाटलांना विचारला. त्यावर ते म्हणाले, साधा प्रश्न आहे की लोकसभेला घवघवीत यश मिळालं. आमची पिछेहाट झाली. तेव्हा ईव्हीएमवर का नाही शंका उपस्थित केली. मग त्यांच्या सर्व खासदारांनी तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता. सर्वोच्च न्यायालायनेही स्पष्ट केलंय की तुमच्याबाजूने जनमत आलं की ईव्हीएम चांगले अन् जनमत तुमच्या विरोधात गेले की ईव्हीएमवर संशय निर्माण केला जातो.”
हेही वाचा >> Bachhu Kadu: ‘बच्चू कडू विश्वासघातकी त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नका’, भाजपा नेत्याने सुनावले खडे बोल
आता राज्याचं वाटोळं करू नका…
राधाकृष्ण विखे पाटलांनी पुढे शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, “शरद पवारांना एवढीच विनंती आहे की, तुम्ही जाणते राजा आहात. पण आता जनार्दन तुम्ही गमावलं आहे. आता कामयस्वरुपी घरी बसा. अनेकजणांचं वाटोळं केलेलं आहे, आता जनतेचं आणि राज्याचं वाटोळं करू नका, हीच विनंती आहे.”
बच्चू कडूंवर टीका
“बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. त्यांचे दिव्यांगाचे धोरण मान्य केले. तरीही सरकारशी प्रतारणा करून त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना पुन्हा महायुतीत सामील करण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. साहजिकच हा निर्णय वरीष्ठ नेते घेतील. पण बच्चू कडू यांच्यासारख्या बेताल, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा घेतले जाईल, याची शक्यता कमीच वाटते. सरकारचे पाठबळ घेऊन सरकारचाच विश्वासघात करणारे बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नये, अशी आमची मागणी आहे”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
द्धव ठाकरे बेताल व्यक्ती – विखे पाटील
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे) पराभव झाल्यानंतर आता नेत्यांकडून आता स्वबळाचा नारा दिला जात आहे. आगामी निवडणुकीत मविआला सोडून स्बळावर निवडणूक लढवू, अशी मागणी काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. आपला जनाधार राहिला नाही, हे विरोधकांनी मान्य करायला हवे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलत होते, तशी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. इतके बेताल विधाने करणारा माणूस मी पाहिला नव्हता. याचा धडा आता लोकांनी त्यांना शिकवला आहे.