Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe : भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी आज शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयात भक्तांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी पैसे आकारावे, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे. पण ही मागणी करत असताना त्यांनी असंही म्हटलं की, ‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतो, तसेच संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’, असं विधान सुजय विखे यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधानावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर भाजपाचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. “सुजय विखे यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी मान्य करतो की साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील. पण त्यांचा हेतू तसा नव्हता”, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली आहे.

हेही वाचा : “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान”, सुजय विखेंच्या विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

“शिर्डीत येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी मोफत प्रसाद मिळाला पाहिजे. पण सुजय विखे यांचं ते वक्तव्य यासाठी होतं की यावर कोणाचंही नियंत्रण नाही. यासंदर्भात काहीतरी नियमावली करावी लागेल. मात्र, साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या प्रसादावर शुल्क आकरण्याची गरज नाही. प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहिल. तसेच साई संस्थानने जे महाप्रसादाचं काम सुरु केलेलं आहे ते कायम सुरु राहिल”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.

“शिर्डीत मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे स्थानिकांच्याही तक्रारी होत्या. नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडली पाहिजे म्हणून सुजय विखे यांनी तशी भूमिका मांडली. पण मला वाटंत की सुजय विखे यांच्या विधानाचा विपर्यास झाला आहे. मी मान्य करतो की त्यांनी जो शब्द वापरला त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील. पण खरं म्हणजे त्यांचा तसा हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव केली आहे.

सुजय विखे काय म्हणाले होते?

“साई मंदिरातील प्रसादालयात आपण मोफत जेवण देतो. मात्र, जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत. जेवणासाठी पैसे घेतले पाहिजेत. तो पैसा वाचेल तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे. कारण संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झालेत. हे योग्य नाही. संस्थानने आपण काय करत आहोत? याचा विचार केला पाहिजे”, असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe patil on sujay vikhe patil statement to shirdi sai sansthan politics gkt