भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचा आरोप

नगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव सुजय विखे यांचा अद्याप भाजपशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपचा कोणताही नेता त्यांच्या संपर्कात नाही. त्यांचे जे काही उमेदवारीसाठी चाललं आहे ते फक्त दबावतंत्र आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबावतंत्र आणत आहेत. माझी त्यांची भेटही नाही. त्यामुळे विखे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या म्हणजे फक्त राजकीय चर्चाच आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी आज, मंगळवारी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आज सकाळी औरंगाबादहून पुण्यास जाताना शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थोडा वेळ थांबले होते. त्या वेळी ते बोलत होते. खा. गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर दानवे व गांधी यांची लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुमारे तासभर चर्चा झाली. निवडणुकीच्या तयारीबद्दलच्या सूचना दानवे यांनी गांधींना दिल्या.

दानवे म्हणाले, लोकसभेसाठी भाजपचा अद्याप उमेदवार निश्चित नाही. राज्याची संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी (दि. ७) होणार होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे ही बैठक आता दि. ११ रोजी होणार आहे. या पहिल्या बैठकीत  उमेदवारांची चर्चा होईल. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत केंद्रीय संसदीय मंडळाकडे राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी पाठवण्यात येईल.

केंद्रीय मंडळाने मान्यता दिल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याची पक्षाची पद्धत आहे. त्यामुळे मी जरी प्रदेशाध्यक्ष असलो तरी अद्याप माझीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. नगरमध्ये खा. गांधी यांना निवडणुकीच्या तयारीच्या सूचना केल्या आहेत. देशात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वाचे उमेदवार आहेत. पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात भाजपची सत्ता येईल.

Story img Loader