अहिल्यानगरःअहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, बीड-आष्टी-परळी रेल्वेमार्ग, माळशेज रेल्वे असे जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
भाजपच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, विनायक देशमुख, अंबादास पिसाळ, सचिन पारखी, बाबूशेट टायरवाले, राजेश काळे, महाविकास नामदे आदी उपस्थित होते. पुणे-नाशिक जलदगती रेल्वेच्या स्वागताचे फलक लावणारे आता मार्ग बदलला तर गप्प आहेत, असाही टोला मंत्री विखे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लागवला.
अनेक धक्के बसून आपण आता धक्कापूरुष झालो आहोत, परंतु आपण एक असा धक्का देऊ की समोरचे नेस्तनाबूत होतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे म्हणाले, ठाकरे यांनी पक्षाला बसणाऱ्या धक्क्यातून आधी स्वतःला सावरावे.
जिल्ह्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव केला जातो, केवळ रस्त्यावरील टपऱ्या व हातगाड्यांच्या अतिक्रमणे हटवली जात आहेत, पक्की अतिक्रमणे हटवली जात नाहीत, या प्रश्नावर बोलताना त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आपण प्रशासनाकडून आढावा घेऊन, असे उत्तर दिले. धनदांडग्यांनी जी पक्की अतिक्रमणे करून इमारती उभ केल्या आहेत त्याबाबत राज्यपातळीवर धोरणात्मक निर्णय व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी-शरद पवार यांची भेट देशाला आत्मनिर्भर करणारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार यांची दिल्लीतील भेट ही देशाला आत्मनिर्भर्तेकडे नेणारे असल्याची मिष्किल टिप्पणी मंत्री विखे यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी देशाला आत्मनिर्भरतेची दिशा दाखवली आहे. त्याला यातून बळकटीच मिळते असे विखे म्हणाले.
‘मंत्री कोकाटे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही’
धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे. मुंडे यांच्या चौकशीसाठी पूर्वीच एसआयटी नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. माणिकराव कोकाटे यांची घटना ३० वर्षांपूर्वीची आहे. त्यांना न्यायालयाने लगेच जामीनही मंजूर केलेला आहे. त्यामुळे कोकाटे यांना लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात करणे योग्य नाही.