शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे तब्बल ७४ हजार ७६२ मतांनी विजयी झाले. जिल्हय़ात त्यांचे मताधिक्य सर्वाधिक ठरले.
विखे यांना १ लाख २१ हजार ४५९ मते मिळाली. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली. जिल्हय़ात सर्वात आधी हाच निकाल जाहीर झाला. विखे यांनी शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांचा ७४ हजार ७६२ मतांनी दारुण पराभव केला. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसह अन्य चार उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. निकालानंतर विखे यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
विखे यांना गणेश परिसरातून १८ हजार ७६५ मतांची आघाडी गणेश परिसराने प्रथमच दिली. विखे यांना ४२ हजार ४२३ मते मिळाली तर शिवसेनेचे अभय शेळके यांना २३ हजार ६५८ मते मिळाली. शिवसेनेचे अभय शेळके व भाजपचे राजेंद्र गोंदकर हे दोघेही शिर्डी शहरातील असताना येथे राधाकृष्ण विखे यांनी ६५६ मतांनी बाजी मारली. संगमनेर तालुक्यातील आश्वी गटातील २६ गावांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात धनुष्याची दोरी घेऊनही काँग्रेसचे विखे यांनी शिवसेनेचे अभय शेळके यांच्यावर २४ हजार ४३८ मतांनी मात केली. शेळके यांना १३ हजार ४६४ तर विखे यांना ३७ हजार ९०० मते मिळाली.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राधाकृष्ण विखे म्हणाले, जनतेने विकासकामांवर शिक्कामोर्तब केला. अपप्रचार करणाऱ्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याचे विखे यांनी सांगितले.

Story img Loader